... तर आरोग्य विभाग भरतीसाठी झालेली परीक्षा रद्द होणार

मुंबई: आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरती परिक्षेत गैरव्यवहार झाले असल्यास परीक्षा तत्काळ रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत केली. या भरतीप्रकरणी कंपनी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पवार यांनी नमूद केले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहार उघड झाला असल्याने परीक्षा रद्द होणार आहेत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाची २८ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा झाली होती. या परीक्षेवेळी एकाच बेंचवर दोन विद्यार्थी, प्रश्नपत्रिका फुटणे, काळ्या यादीतील कंपनीकडे भरतीची सूत्रे, गोंधळ व नियोजनाचा अभाव होता. काही ठिकाणी अर्धा तास उशीरा परीक्षा सुरू झाली. तर नागपूरच्या विद्यार्थ्याला पुण्यात, तर पुण्यातील विद्यार्थ्याला नागपूरमध्ये केंद्र देण्यात आले. या परीक्षेतील घोळाकडे भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आश्वासन दिले. एमपीएससीमार्फत भरती परीक्षा घेण्याचे ठरविल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने घाईघाईने काळ्या यादीतील तीन कंपन्यांना परीक्षेची जबाबदारी दिली. या तीन कंपन्यांनी भरती प्रक्रियेमध्ये अनागोंदी कारभार केल्याचे निदर्शनास आले. राज्यातील युवक रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी करीत असतो. अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचाराच्या मार्गाने या कंपन्यांनी आरोग्य विभागाची परीक्षा घेण्याचा डाव रचला होता. या विषयावर विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार विनायक मेटे यांच्याबरोबरच आमदार डावखरे यांनीही आवाज उठविला. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाले असल्यास तात्काळ परीक्षा रद्द करण्यात येईल व कंपनी दोषी असल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल, असे सभागृहाला आश्वासन दिले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3raM7Aj
via IFTTT

Post a Comment

0 Comments