परीक्षेपूर्वीच मराठवाडा विद्यापीठाचे समन्वयक 'नॉट रिचेबल'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'मॉक टेस्ट'मध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक महाविद्यालयात नेमलेल्या दोन सहसमन्वयकांनी त्यांच्या पातळीवर तांत्रिक समस्या सोडवणे अपेक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या समितीचे सदस्य उत्तर देऊ शकत नाही, असे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. समन्वयक आणि सहसमन्वयकात पुरेसा समन्वय नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची भीती आहे. तांत्रिक समस्या कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांना 'मॉक टेस्ट'मध्ये अडचणी येत आहेत. २८ एप्रिल ते दोन मे या दरम्यान 'मॉक टेस्ट' घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी ६५ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी सुरळीतपणे 'मॉक टेस्ट' दिल्याचे प्रशासनाने सांगितले. तर विद्यार्थ्यांनी अडचणींचा पाढा वाचला आहे. परीक्षेसाठी वीस आयटी समन्वयकांची समिती नेमली आहे. महाविद्यालय स्तरावर दोन सहसमन्वयक नेमले आहेत. पदवी-पदव्युत्तर वर्गाच्या ऑनलाइन सत्र परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना 'मॉकटेस्ट' देणे बंधनकारक आहे. पण, तांत्रिक अडचणींमुळे शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. पेपर 'लॉगिन' न होणे, पासवर्ड चूक दाखवणे, 'फेस रिडिंग' न होणे, संबंधित विषय न सापडणे अशा अडचणी आहेत. तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी संपर्क साधत आहेत. पण, सहसमन्वयक आणि समन्वयक 'नॉट रिचेबल' असल्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थी त्रस्त आहेत. 'विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रत्येकाची समस्या सोडविण्याला प्राधान्य देत आहोत', असे एका समन्वयकाने सांगितले. पदवी परीक्षेचे उर्वरित पेपर तीन मे आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पाच मे पासून आहे. ऑनलाइन परीक्षेची लेखी तक्रार आली नसल्याचे परीक्षा विभागाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास समिती सदस्यांच्या व्हॉटसअॅप क्रमांकावर पीएनआर क्रमांक, नाव, जन्मतारीख, बैठक क्रमांक, पेपरचे नाव, पेपर कोड, अभ्यासक्रमाचे नाव व सत्र ही माहिती पाठवावी. विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेसाठी लॉगइन करतानाच्या अडचणी दूर करण्यास मदत करण्यात येईल, असे परीक्षा विभागाने सांगितले. दररोज ७० ते ८० हजार विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार आहेत. समन्वयाचा अभाव ? परीक्षेच्या अडचणीमुळे पुन्हा 'एमकेसीएल' चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही संस्था आणि विद्यापीठात समन्वय नसल्याने अडचणी वाढल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. ही संस्था विद्यापीठाला पुरेसे सहकार्य करीत नाही. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाचे पुरावे मांडून विद्यापीठाने 'एमकेसीएल'शी असलेला करार मोडावा. इतर कंपन्या चांगले सॉफ्टवेअर देऊ शकतील, असा मुद्दा प्राध्यापकांनी उपस्थित केला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vxdRkp
via IFTTT

Post a Comment

0 Comments