इंजिनीअरिंगचे शिक्षण आता मराठीतूनही मिळणार!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आता इंजिनीअरिंग मराठी माध्यमातून करणेही शक्य होणार आहे. पुण्यातील दोन कॉलेजांनी यासाठी तयारी दर्शविली असून, तसा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने शैक्षणिक वर्ष २०२०-२१पासून आठ भारतीय भाषांमध्ये इंजिनीअरिंग शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलगु, तमिळ, गुजराती, कानडी आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंग्रजीच्या भीतीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असे परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले. ही सुविधा पारंपरिक इंजिनीअरिंगच्या शाखांपुरती मर्यादित असणार आहे. यामध्ये मॅकेनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल आदी शाखांचा समावेश असणार आहे. यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारीही परिषदेने सुरू केली आहे. 'स्वयम' या ऑनलाइन व्यासपीठावर अभ्यासक्रमाचे मराठीतून व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर मराठीतून व्याख्यान देण्याबाबतही सांगितले जाणार आहे असेही सहस्रबुद्धे यांनी सांगितले. तयार असलेल्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भाषांतर केले जाणार आहे. यासाठी १० हजार शब्दसंपदा असलेले सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आले आहे. याचबरोबर काही लेखकांनाही यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. देशातून १४ प्रस्ताव भारतीय भाषांमध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी देशभरातून १४ कॉलेजांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यात राज्यातून मराठी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी 'सीओईपी', पुणे आणि पिंपरी चिंचवड इंजिनीअरिंग कॉलेजांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याचेही सहस्रबुद्धे यांनी सांगितले. परिषदेच्या या निर्णयामुळे इंग्रजीबाबतच्या भीतीमुळे शिक्षणात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दालन खुले होईल अशी भावना व्यक्त होत आहे. मात्र, हे शिक्षण द्विभाषिक असावे जेणेकरून या विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगातही कोणती अडचण येणार नाही अशी सूचना शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uxFSaK
via IFTTT

Post a Comment

0 Comments