आयआयटीयन्सना हवे 'ना नापास' धोरण; विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आयआयटी मुंबईतील सुमारे एक हजारहून अधिक विद्यार्थी किंवा त्यांचे कुटुंबीय यांना करोना आजाराचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांवर परीक्षेचा मानसिक ताण देण्यात आला, इतकेच नव्हे तर अनुत्तीर्णही करण्यात आले. यामुळे यंदा विद्यार्थ्यांसाठी 'ना-नापास धोरण' अवलंबावे, अशी मागणी आयआयटीचे विद्यार्थी करत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. आयआयटी मुंबईने आवश्यक ती सर्व काळजी घेत ऑनलाइन शिक्षणही सुरू केले. ऑनलाइन प्रयोगशाळाही सुरू झाल्या. मात्र तरीही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले, असे नाही. विविध विभागांच्या पाहणीत सुमारे एक हजार विद्यार्थी किंवा त्यांचे कुटुंबीय करोनाच्या आजाराचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत हे विद्यार्थी परीक्षेवर किती लक्ष केंद्रीत करू शकतील, असा प्रश्न उपस्थित करत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी 'ना-नापास धोरण' स्वीकारण्याची मागणी गेली आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२०मध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन योग्य प्रकारे झाले नव्हते, यामुळे 'एस' श्रेणी सुरू करण्यात आली. ही श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणेसाठी वाव देण्यात येणार आहे. मात्र यंदाच्या सत्राला ही श्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सिनेटने अमान्य केला. याबाबत आम्हाला आश्चर्य होत असल्याचे आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या 'इनसाइट' या पोर्टलवर लिहिले आहे. विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन होणे ही आयआयटी प्रशासनाची भूमिका आहे, मात्र ते याच वेळात पूर्ण करावे असा अट्टहास का? विद्यार्थ्यांना जर 'एस' श्रेणी दिली तर ते येत्या काळात सुधारणा करून मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करू शकतील. सद्यस्थितीत विविध ताणतणावाखाली असलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यातच अशा प्रकारे जर कमी गुण अथवा नापास होण्याची नामुष्की ओढावली तर विद्यार्थ्यांवर वेगळ्या प्रकारचा शैक्षणिक ताण येईल. यामुळे विद्यार्थ्यांची ना-नापास धोरणाची मागणी मान्य करावी, असे यामध्ये लिहिले आहे. प्रशासनाला ही मागणी मान्य नसेल, तर त्यांनी त्याचे ठोस स्पष्टीकरण द्यावे, असेही विद्यार्थ्यांनी लिहिले आहे. संस्थेने गतवर्षीप्रमाणेच यंदाही धोरण स्वीकारावे अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. विद्यार्थी हवालदिल यापूर्वी आयआयटी कानपूरने 'ना-नापास' धोरण स्वीकारले आहे. तर आयआयटी दिल्लीने मुदतवाढ दिली आहे. याचबरोबर उत्तीर्ण होण्यासाठी ३० टक्के गुण निश्चित करण्यात आले आहे. बिट्स पिलानी या संस्थेने २० टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी देण्याचा निर्णय घेतला असून श्रेणी सुधारण्याची संधी देण्यात येणार आहे. या प्रमाणे आयआयटी मुंबईनेही करावे, असेही विद्यार्थ्यांनी सुचविले आहे. मात्र याबाबत आयआयटी प्रशासन सकारात्मक नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nZ66kN
via IFTTT

Post a Comment

0 Comments