मराठी शाळांकडे पालकांचा वाढता कल

: इंग्रजी, सीबीएसई, आयसीसई शाळांच्या स्पर्धेत मराठी टिकणे आणि टिकवणे अवघड होत गेले आणि अनेक बंदही पडल्या. मात्र आता पुन्हा इंग्रजीकडे जाणारी ज्ञानगंगा उलटी वाहू लागली असून मराठी शाळांकडे पालकांचा ओढा वाढत असल्याचे समोर येत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना मराठी शाळांमध्ये पूर्व प्राथमिकपेक्षा इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी शाळेतून प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी काम करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. इंग्रजी शाळा, सीबीएसई, आयसीएसई इतकेच नव्हे तर आयबीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक आपले सर्व प्रयत्न, पैसे पणाला लावत होते. यामुळे सामाजिक दबाव वाढत गेला आणि इंग्रजी शाळांचे शुल्क न परवडणाऱ्या पालकानेही आपल्या पाल्याला त्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली. मात्र आता हेच पालक मराठी शाळांकडे वळू लागले आहेत. मराठी शाळांत इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांमध्ये इंग्रजी माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. यंदा हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याचे ठाण्याच्या सरस्वती एज्युकेशन ट्रस्टचे सुरेंद्र दिघे यांनी सांगितले. 'दरवर्षी चार ते पाच असे अर्ज यायचे, मात्र यंदा आमच्या शाळेत असे २५हून अधिक अर्ज आले आहेत. असाच अनुभव दर्जेदार शिक्षण देणाऱ्या मराठी शाळांना येत आहे', असे ते म्हणाले. करोनाकाळात अनेकांचा रोजगार गेला, तर अनेकांची वेतन कपात झाली. यामुळे काहींना शाळांचे शुल्क भरणे शक्य झाले नाही. तसेच भविष्यात ते भरणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. यामुळे हा प्रवाह पुन्हा मराठी माध्यमांकडे वळत आहे. ही शिक्षण संस्थांसाठी मोठी संधी आणि आव्हान असल्याचे दिघे यांनी सांगितले. यानिमित्ताने मराठी शाळा संस्थाचालकांनी भौतिक आणि शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्याकडे लक्ष पुरवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळू शकते ही बाब लोकांना आता पटू लागली आहे. यामुळे तरुण पालक आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास तयार होत असल्याचे 'मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत' या फेसबूक पेजचे संस्थापक प्रसाद गोखले यांनी सांगितले. याबाबत फेसबूक पेजवर अनेक पालक आपले अनुभव देत असतात. इंग्रजी शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरले नाही म्हणून ऑनलाइन वर्गातून बाहेर काढल्याचे प्रकार समोर येत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी अनेक पालक मराठी शाळेकडे वळत आहेत ही सकारात्मक बाब असल्याचे गोखले यांनी सांगितले. अभ्यासक्रमातील बदल महत्त्वाचे मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व आणि राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या समतूल्य झाला आहे ही बाब लोकांच्या लक्षात आली आहे. यामुळे हा बदल पहावयास मिळत आहे, असे मत डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी व्यक्त केले. तर, करोना काळातच इंग्रजी माध्यमातून मराठी शाळेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असले तरी हे प्रमाण मागील दोन वर्षांपासून सातत्याने वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. '२०१९मध्ये आमच्या शाळेत झालेल्या एकूण प्रवेशापैकी ४० टक्के प्रवेश पहिली ते पाचवीचे इंग्रजी शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांचे होते', असेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wFBYhU
via IFTTT

Post a Comment

0 Comments