पदवी अभ्यासक्रमांसाठीही ऐच्छिक सीईटी?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर निकाल कसा जाहीर करायचा, मूल्यमापनासाठी कोणते सूत्र वापरायचे, याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी शालेय शिक्षण विभागाने कॉलेज प्राचार्यांसोबत चर्चा केली. यावेळी बारावी निकालासाठी सीबीएसईने वापरलेले सूत्रच वापरावे, तसेच पारंपरिक अभ्यासक्रमांसाठीही ऐच्छिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करावे, असे मत प्राचार्यांनी नोंदविले. याबाबत शिक्षण विभागही सकारात्मक असल्याचे सूत्रांकडून समजते. करोनामुळे बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला. निकाल कोणत्या निकषांवर जाहीर करायचा, याबाबत चर्चा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने रविवारी शिक्षण विभागातील अधिकारी, ज्युनिअर कॉलेजांचे मुख्याध्यापक आणि सिनिअर कॉलेजांचे प्राचार्य यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले होते. पदवीच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सरसकट प्रवेश परीक्षा घेतल्यास त्यावर तोडगा निघेल, अशा सूचना प्राचार्यांकडून या बैठकीत करण्यात आल्या. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ज्या प्रमाणे प्रवेश परीक्षा होते, त्या प्रमाणेच ही प्रवेश परीक्षा व्हावी, अशी सूचना काही प्राचार्यांनी केली. तर काही प्राचार्यांनी ही परीक्षा अकरावीच्या प्रवेश परीक्षेप्रमाणेच ऐच्छिक असावी, असेही मत मांडले. केंद्रीय शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०:३०:४०चे सूत्र स्वीकारले आहे, त्यानुसारच बारावीचा निकाल लावावा, तसेच पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतल्यास या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यांने प्रवेश द्यावेत, त्यानंतर उर्वरित जागांवर बारावीच्या गुणांआधारे प्रवेश द्यावेत, अशी सूचनाही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व सूचनांची नोंद घेत लवकरच शालेय शिक्षण विभागाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल संदर्भातील मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असावी राज्यातील सर्वच पारंपरिक विद्यापीठांमध्ये पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या स्तरावर नियोजन केले जाते आणि ती प्रक्रिया राबवली जाते. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या कॉलेजांमध्ये प्रवेशावेळी विद्यापीठामार्फत प्रवेशासाठी नोंदणी केली जाते. यानंतर प्रवेश मात्र कॉलेज स्तरावर घेतले जातात. काही विद्यापीठांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असते. यामुळे अकरावीप्रमाणे प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीही केंद्रीभूत प्रक्रियेचे नियोजन करावे, याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xvDHX4
via IFTTT

Post a Comment

0 Comments