सातत्याने करा कौशल्य विका; मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिला सल्ला

० आजच्या आव्हानात्मक स्थितीत विद्यार्थ्यांनी करिअरची निवड कशी करावी? करोनाकाळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. याबरोबरच करिअरच्या वाटाही खूप बदलल्या. डिजिटल माध्यमाचा वापर वाढला. कार्यालयात गेल्याशिवाय काम होत असल्याने भविष्यात अशा संकल्पना अधिक जोर धरतील. या काळात टिकून राहण्याचे मोठे आव्हान विद्यार्थ्यांपुढे असणार आहे. यामुळे करिअरची निवड विद्यार्थ्यांनी खूप काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. फार काळ टिकेल असे करिअर सध्या नसेल. यामुळे विद्यार्थ्यांनी सतत शिक्षण घेणे आवश्यक राहणार आहे. स्वत:मधील कौशल्यांचा विकास करत राहणे हीच यशाची गुरुकिल्ली असणार आहे. लवचिकतेने काम करण्याची तयारी विद्यार्थ्यांना दाखवावी लागणार आहे. ० करिअर निवडताना विद्यार्थ्यांचा नेहमी गोंधळ उडतो. याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सध्या माहितीच्या महाजालात विद्यार्थ्यांना माहितीचे भांडार उपलब्ध झाले आहे. यामुळे करिअरची निवड करताना त्यांनी गृहपाठ करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावे. मी कोण आहे? माझ्यात काय त्रुटी आहेत, काय चांगल्या गोष्टी आहेत, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्याला जे आवडेल ते करा. तरच तुम्ही चांगले काम करू शकाल. घरात अमुक एकाने ही नोकरी केली म्हणून आज तो श्रीमंत आहे, ते पाहून करिअर निवडू नका. कारण तेच फार काळ टिकणार नाही. आपल्याला जमेल, आवडेल अशा क्षेत्रांची यादी तयार करा. ही यादी यानंतर कमी करत तीन ते पाच पर्यायांपर्यंत आणा. तुम्ही निवडलेल्या अखेरच्या तीन पर्यायांची परिपूर्ण माहिती काढा. यासाठी आपल्याला शहर, गाव सोडून जावे लागेल का इथपासून त्याची माहिती काढावी. यानंतर तुमचा करिअर मार्ग तुम्ही ठरवू शकता. लघु कालावधीचे ध्येय आणि दीर्घ कालावधीचे ध्येय ठरवा व सकारात्मकतेने मार्गक्रमण करा. ० काळानुरुप करिअरचे मार्गही बदलत आहेत. यात कोणते पर्याय असू शकतील? काळाचा वेध घेत करिअरची निवड करणे आवश्यक आहे. आज कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा अनॅलिटिक्स, आयटी आर्किटेक्चर, डिजिटल मार्केटिंग, प्रोडक्ट डिझायनर, सायबर सिक्युरिटी, बिहेव्हीअर अँड हेल्थ टेक्निशिअनसारख्या अनेक नव्या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आपण समाजाला काय देऊ शकतो याचाही विचार करणे आवश्यक आहे. ० या दृष्टीने अभ्यासक्रमात काही बदल होणार आहेत का? अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. याचबरोबर येत्या काळात असे महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम तयार होतील, जेणेकरून विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित होऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांनी शिकण्याची जिद्द सोडता कामा नये. कारण सद्य:स्थितीत लवकर क्षेत्र बदल होत आहेत. याचाही विचार विद्यार्थ्यांनी करिअर निवड करताना करावा. उच्च शिक्षणात '' जवळ जवळ १६४ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजांची संख्या ८००च्या घरात पोहोचली आहे. सध्याच्या घडीला साडेसात लाखांहून अधिक विद्यार्थी विद्यापीठात धडे घेत आहेत. संलग्नित कॉलेज - ८३७ एकूण विभाग - ५८ एकूण पदवी अभ्यासक्रम - ३७३ एकूण पदव्युत्तर अभ्यासक्रम - १९० एकूण घेण्यात येणाऱ्या परीक्षा - ४०२ विद्यापीठ आणि संलग्नित कॉलेजमधील विद्यार्थी संख्या - ७,५०,०००


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qdVWy0
via IFTTT

Post a Comment

0 Comments