दहावीच्या शिक्षकांना अखेर लोकलमुभा

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी (SSC result 2021) संबंधित शिक्षकांना लोकलमधून प्रवास () करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड () यांनी गुरुवारी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्य सरकारने शिक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर मुंबई लोकलमधून शिक्षकांना प्रवासाची मुभा मिळणार आहे. शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याचे संकेत गायकवाड यांनी नुकतेच दिले होते. इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा निघेल, असेही आश्वासन दिले होते. इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहाणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होणार आहे. शिक्षकांना उपनगरीय रेल्वेमध्ये लेव्हल २ किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येतील. हे रेल्वे पास ऑनलाइन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. यासाठीची लिंक देण्यात येईल. या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे काम पाहतील असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. सर्व शिक्षकांना परवानगी द्या... केवळ दहावीच्या शिक्षकांना लोकलप्रवासाची परवानगी मिळत असेल तर शाळांतील अन्य इयत्तेच्या शिक्षकांची उपस्थिती बंद करा आणि सर्व शिक्षकांना घरून काम करू द्या, अशी मागणी शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे यांनी केली आहे. तर, शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. इतर शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती व व दहावी, बारावीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. त्यामुळे सर्वांना लोकल सुविधा मिळावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय डावरे यांनी केली आहे. दहावीच्या मूल्यमापन करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली असली तरी ती किचकट व वेळखाऊ प्रक्रिया आहे त्यापेक्षा शाळेच्या ओळखपत्रावर पास देण्यात यावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35yd73S
via IFTTT

Post a Comment

0 Comments