लॉच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा मोठा दिलासा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या (BCI) निर्देशांचे ९ जूनचे परिपत्रक आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाने ()५ जुलैला रोजी काढलेले परिपत्रक यामुळे अडचणीत सापडलेल्या लॉच्या विद्यार्थ्यांना अखेर बुधवारी मोठा दिलासा मिळाला. आमचे निर्देश हे पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार नाहीत, अशी हमी बीसीआयने उच्च न्यायालयात दिल्याने विद्यापीठाने आपले परिपत्रक मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे निकाल ( 2021) जाहीर करायचे राहिले असतील ते दोन आठवड्यांत जाहीर करून गुणपत्रिकाही दिल्या जातील, अशी हमी विद्यापीठाने न्यायालयात दिली. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्यावर्षी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे लॉच्या तीन व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सत्र निकाल हे पूर्वीच्या सत्रामधील सरासरी गुण व अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे जाहीर करण्यात आले होते. गेल्यावर्षी २२ मे रोजी व यावर्षी १० जूनपर्यंत असे निकाल जाहीर करण्यात आले होते. मात्र, बीसीआयने देशभरातील विद्यापीठे व लॉ कॉलेजांना वार्षिक परीक्षा घेण्याविषयी निर्देश देणारे परिपत्रक ९ जूनला काढले. तसेच १० जूनला प्रसिद्धीपत्रकही काढले. त्याआधारे मुंबई विद्यापीठाने ५ जुलैला परिपत्रक काढून आधीचे निकाल रद्द करत प्रत्येक विषयाच्या दोन असाईनमेंट अशा २१ दिवसांत दहा असाईनमेंट पाठवण्यास सांगितले. त्याला लातोया फर्न्स या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीने अॅड. शशांक सुधीर यांच्यामार्फत रिट याचिकेद्वारे तर मनप्रीत कौर पुत्यानी या विद्यार्थिनीने अॅड. प्रशांत पांडे यांच्यामार्फत अर्ज करून आव्हान दिले होते. '२२ मे २०२० रोजी जाहीर केलेले निकाल अशाप्रकारे रद्द करण्याचा बीसीआय व विद्यापीठाला अधिकार नाही. शिवाय नव्या निर्देशाप्रमाणे केवळ दहा दिवसांत २१ असाईनमेंट पाठवण्यास सांगितले आहे. हा मनमानी कारभार व जुलमी पद्धतीचा निर्णय आहे', असा युक्तिवाद अर्जदारांतर्फे सोमवारी करण्यात आला होता. त्याविषयी न्या. रमेश धनुका व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठानेही सहमती दर्शवून नवीन निर्देश पूर्वलक्षी प्रभावाने कसे लागू होऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित केला होता. अखेरीस ते निर्देश पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार नाहीत, असे बीसीआयतर्फे अॅड. अमित साळे यांनी स्पष्ट केले आणि त्यानुसार ५ जुलैचे परिपत्रक मागे घेत असल्याची हमी विद्यापीठातर्फे अॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी दिली. 'मागील काही दिवसांपासून लॉच्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे लागत आहे. अशा परिस्थितीत किमान आता प्रतिवादींनी योग्य भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांची त्यातून सुटका होईल, अशी आशा आहे', असे निरीक्षणही खंडपीठाने आपल्या आदेशात नोंदवले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xc7eVp
via IFTTT

Post a Comment

0 Comments