असा लागणार बारावीचा निकाल; जाणून घ्या एका क्लिकवर...

म. टा. प्रतिनिधी, पुणे बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती जाहीर करताना राज्याच्या शिक्षण विभागाने सीबीएसई बोर्डाच्या पावलावर पाऊल टाकत अंतर्गत मूल्यमापनाचा तोच 'फॉर्म्युला' अवलंबण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये दहावी आणि अकरावीच्या कामगिरीला प्रत्येकी तीस आणि बारावीतील कामगिरीला चाळीस टक्के 'वेटेज' देण्यात येणार आहे. हे मूल्यांकन कसे असेल, विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण कसे मिळतील, त्यांचे गुणांकनात रूपांतर कसे होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला हा प्रयत्न. दहावीत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचा विचार या फॉर्म्युलामध्ये दहावीच्या कामगिरीसाठी ३० टक्के, अकरावीच्या कामगिरीसाठी ३० टक्के आणि बारावीच्या कामगिरीसाठी ४० टक्के निश्चित करण्यात आले आहेत. दहावीचा विचार केला तर विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ज्या तीन विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळाले त्या विषयांची सरासरी घेऊन त्याचे तीन टक्क्यांमध्ये रूपांतर केले जाईल. (उदा. एखाद्या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयात सर्वाधिक गुण असतील; तर मूल्यमापन करताना या विषयांची सरासरी विचारात घेतली जाईल.) अकरावीसाठी सर्व विषयांचा विचार बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीसाठी ३० टक्क्यांचे 'वेटेज' देण्यात आले असून त्यामध्ये अकरावीची विषयनिहाय कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. अकरावीच्या परीक्षा आणि प्रात्यक्षिकांमध्ये मिळालेल्या सर्व गुणांचे एकत्रीकरण करून त्याचे ३० टक्क्यांमध्ये रूपांतर केले जाईल. यामध्ये दहावीसारख्या केवळ तीन विषयांचा विचार न करता सर्व विषयांची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. बारावीच्या अंतर्गत परीक्षांचे गुण बारावीच्या वर्षात महाविद्यालयांनी ऑनलाइन-ऑफलाइन परीक्षा घेतल्या आहेत. त्या परीक्षांमध्ये विषयनिहाय मिळालेले गुण कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणतक्त्यात भरावे लागणार असून त्यानंतर त्याचे रूपांतर ४० टक्क्यांमध्ये केले जाणार आहे. श्रेणी विषयांचेही मूल्यमापन होणार बारावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी विषयांचेही गुण मिळणार आहेत. कला-क्रीडा; तसेच इतर श्रेणी विषयांचे मूल्यांकन केले जाणार असून विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणांमध्ये याचा समावेश केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कला-क्रीडाचे गुण मिळू शकणार आहेत. गृहकार्य, स्वाध्यायाद्वारे मूल्यमापन बारावीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन स्वाध्याय, प्रात्यक्षिके, गृहकार्याद्वारे होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, महाविद्यालये ऑनलाइन स्वरूपात जरी झाली असली, तरी विद्यार्थ्यांचे स्वाध्याय, प्रात्यक्षिके आणि गृहकार्ये किती प्रमाणात झाली, याबाबत साशंकता असल्याने यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पुनर्परीक्षा देणाऱ्यांसाठी यंदा बारावीची पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे केवळ दहावी आणि बारावीचे गुण लक्षात घेतले जाणार आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या दहावीतील सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांच्या गुणांना ५० टक्के 'वेटेज'; तर बारावीतील कामगिरीला ५० टक्के 'वेटेज' देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांसाठी अकरावीतील प्रक्रिया ग्राह्य धरली जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3whkp70
via IFTTT

Post a Comment

0 Comments