Also visit www.atgnews.com
शाळा संभ्रमाच्या वर्गात; मार्गदर्शक सूचनांमुळे शिक्षक, संस्थाचालक गोंधळात
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याने राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा येत्या १७ ऑगस्टपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी त्याबाबत मंगळवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे शिक्षक व शिक्षणसंस्थाचालक संभ्रमाच्या वर्गात बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मास्क, शारीरिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, शाळांचे निर्जंतुकीकरण हे नियम शाळांना पाळावे लागतील. मात्र इतर नियमांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या शाळा सुरू होतील अशा संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो शाळेच्याच शहरात किंवा गावात करावी; तसेच, शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये, असे सूचनेत नमूद केले आहे. त्यामुळे शिक्षक व संस्थाचालक बुचकळ्यात पडले आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहर येथील करोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांना अधिकार दिले आहेत. राज्य सरकारने २ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या 'ब्रेक द चेन'मधील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शाळांबाबतचा निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे निर्बंधांबाबतच्या पातळ्यांबाबत जसा गोंधळ होत होता, त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीमध्ये प्रभाग अधिकारी, पालिकेचे वैद्यकीय अधिकार आणि शिक्षण अधिकारी यांचा समावेश असेल. शाळा अशा भरणार... अधिक प्रमाणात विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रांत भरवण्याची सूचना करण्यात आली आहे. एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असतील. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर असेल. विद्यार्थ्यांना शाळेतील उपस्थिती बंधनकारक राहणार नाही. पूर्णपणे पालकांच्या संमतीने विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकतात, असे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gbva5F
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments