शिक्षकांनो खबरदार, शाळेत थुंकलात तर....

म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षकाने शाळेत थुंकल्यास, त्याच्याकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात यावा. शिक्षकाने वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास, तर त्याच्याकडून एक हजार २०० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. राज्यात गेल्या दीड वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव आहे. करोनाबाधित व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे इतर व्यक्तीही प्रभावित होऊ शकतात व प्रसार वाढू शकतो. क्षयरोगांसारख्या अन्य आजारांची लागण इतरत्र थुंकल्यामुळे होऊ शकते. याची गंभीर दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी संबंधित आदेश काढले आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे व त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे व त्यांना शिक्षणासाठी निरोगी वातावरण पुरविणे आवश्यक आहे. शाळा परिसरात थुंकल्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये व विद्यार्थ्यांना करोनासारख्या रोगाची लागण होऊ यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांसाठी थुंकणेविरोधी मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाचे जारी केल्या आहेत. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची मूल्ये अंगी रुजवण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रार्थनेअंती व शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता या विषयाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक संसर्गाविषयी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शन करावे व त्यांना त्यापासून परावृत्त करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्याचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शनही करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दंडवसुलीचे अधिकार मुख्याध्यापकांना शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याने शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल; अन्यथा प्रतिव्यक्ती २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. वारंवार उल्लंघन झाल्यास एक हजार २०० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत सामान्य नागरिकांचीही जबाबदारी असणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडूनही सूचनांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. दंड वसूल करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत, असे निर्णयात सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yHiWZK
via IFTTT

Post a Comment

0 Comments