अकरावी सीईटीसाठी एकच सामायिक प्रश्नपत्रिका करा: हायकोर्ट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सीईटी चाचणीसाठी सामायिक प्रश्नपत्रिका तयार करण्यात यावी यादृष्टीने सीबीएसई, आयसीएसई व अन्य बोर्डांना आपले प्रश्न संच एसएससी बोर्डाकडे पाठवता येतील, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी केली. तसेच याचिकादार व अन्य सर्व प्रतिवादींनी सीईटीच्या या वादाविषयी आपापले लेखी युक्तिवाद व संदर्भासाठीचे न्यायालयीन निवाडे गुरुवारी (आज) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दाखल करावेत, असे निर्देश देऊन न्या. रमेश धनुका व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने याप्रश्नी उद्या, शुक्रवारी अंतिम सुनावणी ठेवली. करोना संकटामुळे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एसएससी बोर्ड) तसेच सीबीएसई, आयसीएसई व इतर शिक्षण मंडळांच्या दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारेच विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आले. मात्र, मुंबई व अन्य शहरांतील प्रसिद्ध कॉलेजांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी सर्वच बोर्डांच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा असते. ते लक्षात घेऊन प्रवेशासाठी सीईटी चाचणी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, ही सीईटी एसएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, असे राज्य सरकारच्या २८ मे रोजीच्या अधिसूचनेत स्पष्ट झाले. त्यामुळे आयसीएसई बोर्डच्या दादरमधील आयईएस ओरायन स्कूलमधील अनन्या पत्की हिने तिचे वडील अॅड. योगेश पत्की यांच्यामार्फत रिट याचिका करून त्याला आव्हान दिले आहे. 'सीईटीसाठी एसएससी बोर्डच्या जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ हजारांपर्यंत आहे. त्यामुळे न्यायालयात न आलेल्या विद्यार्थ्यांचाही विचार व्हायला हवा. एसएससी बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटीला हरकत नसल्याचे सीबीएसई बोर्डने कळवले आहे, मात्र आयसीएसई बोर्डाने याविषयी अद्याप मौन बाळगले आहे', असे राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी निदर्शनास आणले. 'प्रत्येक शिक्षण मंडळांतर्गत अकरावी व बारावीसाठीही कॉलेज आहेत. इतर बोर्डांच्या प्रवेशांवर आमचे नियंत्रण नाही. आमची सीईटी ही खरे तर केवळ राज्यातील एसएससीच्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊनच ठेवली आहे. इतर बोर्डांचे विद्यार्थी एसएससी बोर्डांतर्गत असलेल्या कॉलेजांकडे येत असतील तर त्यांच्या अटीशर्ती कशा मानता येतील? कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारताना आम्हाला आनंद होत नाही. मात्र, आमचा नाईलाज आहे. सर्व बोर्डांचा अभ्याक्रम एकत्र करत प्रश्नपत्रिका तयार करणे अशक्य आहे', असे म्हणणे कुंभकोणी यांनी मांडले. 'सामायिक प्रश्नपत्रिका होऊ शकते' 'इतर बोर्डांनी त्यांचे प्रश्नसंच एसएससी बोर्डाकडे पाठवावेत. त्यानंतर समतोल प्रश्नपत्रिका तयार करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सीईटीसाठी प्रत्येकी २५ गुणांचे सात भाग असणारी प्रश्नपत्रिका असेल. त्यातील चार भाग एसएससी बोर्डाच्या गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान व इंग्रजी या विषयांतील प्रश्नांसह आणि इतर तीन भाग इतर बोर्डांच्या विषयांतील प्रश्नांसह करता येतील. विद्यार्थ्यांना सातपैकी चार भागांचे प्रश्न सोडवण्याची मुभा ठेवता येईल', अशी सूचनाही कुंभकोणी यांनी मांडली. मात्र, अशा सूचना स्वीकारण्यास याचिकादारांनी नकार दिला. त्यामुळे खंडपीठाने याप्रश्नी उद्या अंतिम सुनावणी ठेवली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fxCY1f
via IFTTT

Post a Comment

0 Comments