डीएव्ही शाळेबाहेर पालकांचे ठिय्या आंदोलन; अतिरिक्त शुल्कवसुली थांबवण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई सीवूडमधील सेक्टर ४८मधील डीएव्ही पब्लिक शाळेसमोर बुधवारी शेकडो पालकांनी आंदोलन करून शाळा व्यवस्थापनाचा निषेध केला. ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही शाळेकडून अन्य अॅक्टिव्हिटी आणि अतिरिक्त फी घेतली जात आहे. शिवाय, ट्युशन फी भरल्यानंतरही पालकांना इतर फी भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगत पालकांनी शाळेला घेराव घातला होता. सर्व पालकांना शाळा व्यवस्थापनाशी बोलून आपल्या शंकांचे निरसन करायचे होते, मात्र शाळेने केवळ काही ठराविक पालकांनाच भेट दिली. त्यामुळे उरलेल्या सर्व पालकांनी शाळेबाहेरच ठिय्या मांडून निषेध केला. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही मुलांच्या शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे शाळेच्या अनेक सोयीसुविधांचा वापर विद्यार्थी करत नाहीत. शाळेत होणाऱ्या अन्य अॅक्टिव्हिटी बंद आहेत. त्यामुळे शाळांनी १५ टक्के शुल्क कमी आकारावे, अशा सूचनाही सरकारने शाळांना केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही शाळेने शालेय शुल्क कमी केलेले नाही. सीवूड सेक्टर ४८ मधील डीएव्ही पब्लिक स्कूलने पालकांना दरवर्षीप्रमाणेच शाळेचे शुल्क भरण्यास सांगितले आहे. मात्र सर्व शुल्क भरण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे बुधवारी शुल्कासंदर्भात शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी मोठ्या संख्येने पालक शाळेबाहेर जमले होते. मात्र शाळा व्यवस्थापनाने काही मोजक्याच पालकांना शाळेत प्रवेश दिला आणि मोठ्या संख्येने जमलेल्या पालकांना बाहेरच अडवून ठेवले. त्यामुळे बाहेर राहिलेल्या पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या मांडला. लॉकडाउनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने शाळेने ट्युशन फी व्यतिरिक्त अन्य शुल्क आकारू नये, अशी या सर्व पालकांची मागणी आहे. शाळेत प्रवेश घेताना पालकांकडून अनामत रक्कम घेतली जाते. ती रक्कम शाळेकडे असताना शाळा इतर अॅक्टिव्हिटी फी का आकारली जात आहे, असा प्रश्नही यावेळी काही पालकांनी उपस्थित करत हे अतिरिक्त शुल्क आकारण्याचे थांबवावे, अशी मागणी केली. शाळा ऑनलाइन भरत असल्याने मुलांना शिकवलेले व्यवस्थित कळत नाही. त्यांना अभ्यास समजून सांगायचे काम पालकांना करावे लागते. त्यांचा अभ्यास झाला की नाही ते बघायचे आणि तपासायचे कामही पालकांनाच करावे लागते. तसेच, मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठीही मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेटचा खर्च पालकांना करावा लागतो. तरीदेखील शाळा अतिरिक्त शुल्क कशी आकारू शकते, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार स्थानिक शिवसेना नेते समीर बागवान, विशाल विचारे आदींनी शाळेत जाऊन पालकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका एस कुरियन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. या संदर्भात नवी मुंबई पालक संघटनेने बुधवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन या अतिरिक्त शुल्क वाढीबाबत तक्रार केली. तसेच, केवळ १५ टक्के शुल्क सवलतीबाबत पालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VOvAYv
via IFTTT

Post a Comment

0 Comments