राज्यात मुंबई वगळता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यात मुंबई वगळता पुण्यासह सर्व जिल्ह्यांत गुरुवारी पाचवी आणि आठवीची सुरळीत पार पडली. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिली असून, साधारण ८५ टक्के विद्यार्थ्यांनी उत्साहाने उपस्थिती लावली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी साधारणपणे फेब्रुवारीत घेण्यात येते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष विस्कळित झाल्याने जानेवारीमधील परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याचे परिषदेने नियोजन केले होते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिलमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलावी लागली. अखेर राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आठ ऑगस्टला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, आठ ऑगस्टला दुसऱ्या एका परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याने ही परीक्षा १२ ऑगस्टला घेण्याचे ठरले. त्यानुसार ही परीक्षा झाली. पाचवीच्या तीन लाख ८८ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या दोन लाख ४४ हजार २६० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यभरातील साधारण ५ हजार ६८७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. राज्यात साधारण ८५ ते ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एका वर्गात २४ विद्यार्थी याप्रमाणे परीक्षा देण्याची व्यवस्था केली होती. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आला होता. परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना मास्क बंधनकारक करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावरील स्वछतागृहांमध्ये मुबलक पाणी आणि साबण आदी सुविधा उपलब्ध करून दिले होते. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्याची सूचना जिल्ह्यांना देण्यात आली होती, असे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये परीक्षा सुरळीत 'पिंपरी-चिंचवडमध्ये ५६ परीक्षा केंद्रांवर पाच हजार चार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. करोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. मुलांनी सुरक्षित अंतर पाळून परीक्षा दिली. परीक्षा केंद्रात प्रवेश, सॅनिटायझर, थर्मल गनची आदी व्यवस्था करण्यात आली होती,' अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VMnyis
via IFTTT

Post a Comment

0 Comments