FYJC Admission 2021: अकरावी प्रवेश अर्ज कसा भरायचा... स्टेप बाय स्टेप जाणून घ्या...

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला शनिवार १४ ऑगस्ट २०२१ पासून सुरुवात झाली आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जाचा पार्ट १ तसेच पार्ट २ कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आम्ही येथे देत आहोत... अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रांतील इयत्ता अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी लॉग-इन आयडी घेऊन अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे. यासाठी २२ ऑगस्ट रोजी रात्री ११पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याच दरम्यान १७ ऑगस्ट रोजी अकरावीसाठी उपलब्ध जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. यासाठीही २२ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कसा भराल अकरावी ऑनलाइन अर्ज? - मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती येथील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची मध्यवर्ती प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. - अकरावीत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 11thadmission.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. - विद्यार्थ्यांनी स्वत:चा लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करावी. स्वत:चा लॉगइन आयडी आणि पासवर्ड कोणाहीसोबत शेअर करू नये. पार्ट - १ अर्जाचा पहिला भाग कसा भराल? - अॅप्लिकेशन पार्ट -१ भरण्यासाठी संकेतस्थळावर जाऊन सर्वात आधी आपल्याला ज्या भागातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, तो शहरी भागाच्या नावावर क्लिक करावे. - यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन करावे. जो आयडी पासवर्ड क्रिएट केलाय तो वापरून लॉग इन करावे. पार्ट १ चा फॉर्म ओपन होईल, तो भरावा. - पार्ट १ भरताना दिलेले प्रश्न नीट वाचून विचारलेली माहिती भरा. यात नाव, पत्ता, ईमेल, गुण, प्रवर्ग, कोणत्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा आहे आदी माहिती यात भरावी. - फॉर्म पूर्ण भरल्यानंतर, जर विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थी असतील, तर त्यांना ते प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. - प्रवेश शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. - यानंतर आपला अर्ज लॉक करायचा आहे. मुलांनी हे लक्षात घ्यावे की फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर तो नीट वाचून लॉक करायचा आहे. लॉक न केल्यास तो सबमीट होणार नाही. - डॅश बोर्डवर आपल्या फॉर्मचे स्टेटस नक्की पाहा. (व्हेरिफाइड किंवा नॉनव्हेरिफाइड असे स्टेटस दिसेल.) - ज्यांनी विशिष्ट प्रवर्गातून अर्ज भरला आहे, त्यांनी आपला अर्ज आपल्या शाळेत किंवा जवळच्या गायडन्स सेंटरमधून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. राज्य मंडळाच्या शाळा आपल्या विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा लॉगइनमधून व्हेरिफाय करतात. अन्य बोर्डाच्या विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी गायडन्स सेंटरमधून आपला अर्ज व्हेरिफाय करायचा आहे. पार्ट - २ अर्जाचा दुसरा भाग - ऑप्शन फॉर्म कसा भराल? - आपल्याला ज्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा आहे, त्या महाविद्यालयाचे नाव या फॉर्ममध्ये भरायचे आहे. विद्यार्थी किमान १ आणि जास्तीत जास्त १० कॉलेजांची नावे देऊ शकतात. - कॉलेजचा पसंतीक्रम भरण्यापूर्वी कॉलेजांची मागील वर्षीची कट ऑफ नक्की पाहा आणि आपल्या गुणांनुसार त्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो का याचा अंदाज घ्यावा. अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - भाग एक भरणे : १४ ते २२ ऑगस्ट भाग एक व दोन भरणे : १७ ते २२ ऑगस्ट प्रवेशाची गुणवत्ता यादी : २७ ऑगस्ट प्रवेश घेणे : २७ ते ३० ऑगस्ट प्रवेशाची दुसरी फेरी : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर प्रवेशाची तिसरी फेरी : ५ ते ११ सप्टेंबर प्रवेशाची चौथी फेरी : १२ ते १७ सप्टेंबर कोटा प्रवेश कोटा प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांना १७ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भाग एक आणि दोन पूर्ण भरायचे आहे. त्यानंतर या अर्जाची प्रिंटआउट घेऊन, ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या ठिकाणी तो द्यायचा आहे. त्यानंतर कॉलेजांकडून प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. या यादीतील विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणेच प्रवेश घ्यावे लागणार आहे. कॉलेजांमधील अंतर्गत, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया होऊन उर्वरित जागा ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मुभा देण्यात येणार आहे. यानंतर २३ ऑगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यामधील त्रुटी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५पर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. यानंतर २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, याबाबतचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे विभागाने स्पष्ट केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CK37DP
via IFTTT

Post a Comment

0 Comments