Also visit www.atgnews.com
Fyjc Admissions 2021: सीईटी रद्द: आता अकरावी प्रवेशाचा पेच
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईदहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावी प्रवेश कोणत्या निकषांवर द्यायचे याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्य सरकारने प्रवेश परीक्षेचा () पर्याय समोर आणला. मात्र आता ही प्रवेश परीक्षाच रद्द केल्याने अकरावी प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याचा फटका कला शाखेतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर सर्वच शिक्षण मंडळांनी इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध घटक चाचण्या या आधारे विशिष्ट सूत्राचा वापर करून दहावीचा निकाल जाहीर केला. यामुळे यंदा नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या, इतकेच नव्हे तर १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. यंदा प्रथमच दहावीचा निकाल ९९.९५ इतका लागला. यामध्ये राज्यात ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण प्राप्त झाले, तर यंदा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असल्याचे समोर आले आहे. यंदा ९० टक्क्यांच्यावर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १ लाख ४ हजार ६३३ इतकी आहे, तर ८५ ते ९० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी १ लाख २८ हजार १७४ इतके आहेत. एकट्या मुंबई विभागाचा विचार केला असता, एक लाख १० हजार ९७९ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून, तर एक लाख ५९ हजार ८११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. यामुळे प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्याचा विचार या विद्यार्थ्यांनी केला होता. राज्य मंडळाने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेची तयारीही सुरू केली होती. मात्र आता ही परीक्षा होणार नाही. यामुळे प्रवेशपेच निर्माण झाला आहे. मुंबईत सर्वाधिक प्रवेश हे वाणिज्य शाखेत होत असले तरी काही नामांकित कॉलेजांमध्ये कला शाखेला विशेष मागणी असते. इतर मंडळांत गणित विषय न घेता परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. अशा विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने त्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळते. यामुळे राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवणे आव्हानात्मक ठरणार आहे. वाणिज्य शाखेतील प्रवेशामध्येही काही प्रमाणात ही स्पर्धा पाहावयास मिळणार आहे. यंदा सर्व नामांकित कॉलेजांची गुणवत्ता यादी ९५ टक्क्यांच्या आसपासच बंद होईल, असा अंदाजही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळूनही विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज मिळणार नाही, अशी परिस्थिती यंदा पहावयास मिळणार आहे. जागा वाढवून देण्याची मागणी राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशामध्ये समान न्याय मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने आता नामांकित कॉलेजांमध्ये काही जागा वाढवून द्याव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CEHvso
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments