ऐन दिवाळीत शिक्षकांचं शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन

मुंबई: आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी ऐन दिवाळीत शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. वाढीव पदांना मान्यता द्यावी आणि वेतन देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील ८० शिक्षकांचे सकाळी१०.३० वाजल्यापासून वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. मागण्या पूर्ण करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक २००३ ला नियुक्ती दिनांकापासून वाढीव/प्रस्तावित पदांना वेतनासहित मंजुरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. गेली १० ते १५ वर्षे आम्ही विनावेतन काम करत आहोत. आमची मागणी पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी निवेदने करुन न्याय मागितला. पण आमची मागणी मान्य झाली नसल्याचे कृती समितीचे अध्यक्ष सतिन चव्हाण यांनी सांगितले. २००३-०४ ते २०१८-१९ पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव प्रस्तावित पदांची संपूर्ण माहिती संचालक स्तरावरुन मंत्रालय स्तरावर पोहोचविण्यात आली आहे. आज आंदोलनाचा ६२ वा दिवस आहे. आमच्या वाढीव पदांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून आमच्या सुरु असलेल्या हालअपेष्ठा थांबवाव्यात अशी मागणी कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात कृती समितीततर्फे शालेय शिक्षणमंत्री यांना देखील पत्र देण्यात आले आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या सर्व शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bBxQGR
via IFTTT

Post a Comment

0 Comments