२० महिन्यांनंतर मुलं शाळेत येणार; पालक-शिक्षकांसाठी काही खास टिप्स

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : तब्बल २० महिन्यांनंतर मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी एका नव्या उमेदीने पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. मात्र प्रदीर्घ काळासाठी शाळेतली अनुपस्थिती आणि घरबसल्या ई-लर्निंगची नवी शिक्षण पद्धती यांमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांपुढेही नवीनच आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग करत आहेत. यात समुपदेशनावर विशेष भर दिला जात आहे. करोना साथ सुरू होण्यापूर्वी जे विद्यार्थी इयत्ता पहिली किंवा दुसरीत होते, ते आता थेट इयत्ता तिसरी किंवा चौथीच्या वर्गात बसणार आहेत. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा या प्राथमिक वर्गांतील विद्यार्थ्यांना शाळेशी पुन्हा एकदा जुळवून घेणे अवघड जाऊ शकते. म्हणूनच सर्वांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे, असे मत डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. शाळेतील समुपदेशिका प्राजक्ता गांगल-भाटकर आणि त्यांचे सहकारी नियमितपणे विद्यार्थी-पालकांचे समुपदेशन करत आहेत. ई-लर्निंगमुळे वर्गात एकाच वेळी ५० ते ६० विद्यार्थ्यांना शिकवण्याची शिक्षकांची सवयही मोडली असून दीड वर्षानंतर शाळेत परतणाऱ्या प्राथमिक विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधावा, याबाबत खास शिक्षकांसाठीही विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असेही प्रधान यांनी सांगितले. करोनापश्चात शालेय वातावरणाला खरी गरज आहे ती सकारात्मक विचारांची. नव्या उमेदीने ही लहान मुले-मुली शाळेत येणार आहेत. शाळेतला त्यांचा वावर हा अधिकाधिक सहज आणि अभ्यासू वृत्तीला चालना देणारा हवा, असे मत समुपदेशिका प्राजक्ता गांगल-भाटकर यांनी व्यक्त केले. परीक्षेचे दडपण सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षांचे दडपण असल्याचे समुपदेशन करताना जाणवत असल्याचे कुर्ला येथील गांधी बाल मंदिरमधील समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांच्या समुपदेशनावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच आता शाळा सुरू होतील, तेव्हाही अनेक विद्यार्थी हे प्रथमच शाळेत येणारे असतील. यामुळे त्यांना विशेष समुपदेशनाची आवश्यकता आहे. या दृष्टीने आमच्या शाळेतही तयारी सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. समुपदेशिका प्राजक्ता भाटकर यांनी दिलेल्या काही टीप्स विद्यार्थ्यांसमोर ही आव्हाने.... १. प्रदीर्घ काळ शाळेत न गेल्यामुळे विद्यार्थ्यांची एकाच जागी काही तास बसून राहण्याची सवय तुटलेली आहे. त्यामुळे आता नव्याने शाळेत आल्यावर त्यांना वर्गातील बाकांवर काही तास चुळबूळ न करता बसून राहणे अवघड जाऊ शकते. २. घरी हवे तसे बसण्याची- वागण्याची तसेच कधीही झोपण्या-उठण्याची मोकळीक विद्यार्थ्यांना गेले दीड वर्ष होती. शाळेतील शिस्तशीर वातावरणामुळे आता त्यांच्या वर्तनात थोडा अवघडलेपणा येऊ शकतो. ३. विद्यार्थी वरच्या इयत्तेत गेले खरे, पण आधीच्या इयत्तेतला त्यांचा अभ्यास खराच पक्का झालाय का, याबाबत त्यांच्याच मनात साशंकता असू शकते. अभ्यासाबाबतचा त्यांचा आत्मविश्वास ढासळलेला असू शकतो. पालकांनी घ्यावयाची काळजी- १. शाळेच्या वेळा, अभ्यासाचे तास आदींना केंद्रस्थानी ठेवून पालकांनी पाल्यांचा दिनक्रम आखण्यास आणि त्यानुसार वागण्यास सहकार्य करावे. २. शाळेचे- शिक्षकांचे तसेच अभ्यासाचे महत्त्व आपल्या पाल्यांना पटवून देणे गरजेचे आहे. ३. मुलांच्या मनात शाळेविषयी वा शिक्षकांविषयी कोणत्याही प्रकारची भिती राहणार नाही, याबाबत पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. शिक्षकांनी घ्यावयाची काळजी- १. विद्यार्थी वरच्या इयत्तेत गेले असले, तरी त्यांचा मागील वर्षाचा अभ्यासक्रम, त्यातील संकल्पना त्यांना पुरेशा समजल्या आहेत का, यावर शिक्षकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. २. वर्गात विद्यार्थ्यांना कदाचित त्याच त्या संकल्पना किंवा मुद्दे समजावून सांगण्याची वेळ शिक्षकांवर येऊ शकते. अशा वेळी शिक्षकांनी संयम राखणे तसेच विद्यार्थ्यांना समजून घेणे गरजेचे आहे. ३. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शक्यतो हसत-खेळत, गोष्टी सांगत, शिकवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करायला हवा. यामुळे या लहान विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यास मदत होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3roiKxH
via IFTTT

Post a Comment

0 Comments