Health Department Exam: प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांवर न्यासा कम्युनिकेशनचे स्पष्टीकरण

Health Department Exam: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठीची परीक्षा रविवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सुरळीतपणे पार पडल्याचे परीक्षेचे व्यवस्थापन करणाऱ्या न्यासा कम्युनिकेशनने म्हटले आहे. साडेचार लाखांहून अधिक परीक्षार्थी या परीक्षेस सामोरे गेले असून राज्यभरातील तब्बल १३६४ केंद्रांवर चोख व्यवस्थापनासह परीक्षा यशस्वीपणे पार पडली. दरम्यान काही संघटनांनी या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा केलेला आरोप फेटाळून लावत असे खोटे आरोप काही मंडळींकडून जाणीवपूर्वक केले जात असल्याचे‘’ने म्हटले आहे. कोरोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ‘गट ड’ संवर्गातील तब्बल ३४६२ रिक्त पदे या परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. या परीक्षेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आरोग्य विभागाकडून ‘न्यासा कम्युनिकेशन’कडे सोपविण्यात आली होती. राज्यभरातील १३६४ परीक्षा केंद्रांवर एकाच सत्रात झालेल्या या परीक्षेस राज्यभरातून तब्बल ४,६१, ४९७ परीक्षार्थी सामोरे गेले. दरम्यान काही विद्यार्थी संघटनांनी ‘गट ड’च्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा दावा केला असून या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचे ‘न्यासा कम्युनिकेशन’ने स्पष्ट केले आहे. अशी होती प्रश्नपत्रिकांची सुरक्षा व्यवस्था... ‘न्यासा कम्युनिकेशन’ने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यभरातील १३६४ परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा खबरदारीसह पोहोचविण्यात आल्या. २४ प्रश्नपत्रिकांचा एक संच करण्यात आला होता. हा संच आवरणात व्यवस्थित बंदिस्त करून तो मोहोरबंद करण्यात आला होता. संबंधित परीक्षा केंद्रांवरील असे संच एका पेटीत आवरणबद्ध करून अशा पेट्याही मोहोरबंद करूनच परीक्षा केंद्रांवर दाखल झाल्या. अशा पेट्या किंवा त्यातील प्रश्नपत्रिका संच मोहोरबंद अवस्थेतच परीक्षार्थींपर्यंत पोहोचविण्यात आले आणि त्यात कोणतीही अनियमितता एकाही परीक्षा केंद्रावर झाली नाही. इतकी पारदर्शकता राखलेली असताना पेपर फुटूच शकत नाही, असे ‘न्यासा कम्युनिकेशन’ने म्हटले आहे. परीक्षा यशस्वी झाल्यानंतर आरोप चोख व्यवस्थापनासह आणि पारदर्शक पद्धतीने घेतल्या गेलेल्या परीक्षा प्रक्रियेस बदनाम करण्यासाठीच असे आरोप होत असल्याचेही ‘न्यासा कम्युनिकेशन’चे म्हणणे आहे. परीक्षा दुपारी चार वाजता यशस्वीपणे पार पडली. तोवर कोणताही आरोप झाला नाही, याकडेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने लक्ष वेधले आहे. पेपर फुटल्याचे तथाकथित पुरावे म्हणून जे स्क्रीनशॉट्स वा छायाचित्रे पसरवली जात आहेत, ती परीक्षा पार पडल्यानंतरची आहेत. मोबाइलच्या सेटिंगमध्ये वेळ बदलून स्क्रीनशॉट छायाचित्र घेतल्याने अशा आरोपांना वैधता मिळत नाही. परीक्षा यशस्वी होऊच नये यासाठी जाणीवपूर्वक काही मंडळी कार्यरत आहेत. त्यांच्या पाठबळाने असे खोटे आणि निराधार आरोप केले जात असल्याचे ‘न्यासा कम्युनिकेशन’ने म्हटले आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी अशा कोणत्याही जाणीवपूर्वक पसरवल्या जात असलेल्या अफवांवर वा आरोपांवर विश्वास ठेवू नये अथवा प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन करत ‘न्यासा कम्युनिकेशन’ने या परीक्षेद्वारे निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q6Q2jU
via IFTTT

Post a Comment

0 Comments