Constitution Day 2021: राज्यभरात विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन

2021: २६ नोव्हेंबर हा संविधान दिन देशभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये 'माझे संविधान,माझा अभिमान' उपक्रम राबविण्यात आला आहे. या अंतर्गत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील प्रातिनिधिक स्वरुपात दोन शाळांसमोर ऑनलाइन माध्यमातून संविधान उद्देशिकेचे वाचन केले. घटनाकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेत राज्यघटनेची निर्मिती केल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी गठीत समितीने ती स्वीकारली.त्यानंतर स्वतंत्र भारतीय राज्यघटना अंगिकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करण्यात आली. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह भारतीय संविधानाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या त्या तमाम व्यक्तिमत्वांना अभिवादन करणे,आदरांजली वाहणे;त्याचप्रमाणे संविधानातील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाल्या. संविधान दिनानिमित्त शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धायरी येथील बी.के.चव्हाण शाळा आणि जिल्हा परीषद पिंपळगाव महाळुंगे येथील शाळांच्या विद्यार्थ्यांसमोर प्रातिनिधिक स्वरुपात संविधान उद्देशिकेचे वाचन केले. कायदे म्हणजे काय? कायदे कशासाठी? राज्यघटना नेमका काय प्रकार आहे?असे अनेक प्रश्न बालमित्रांना पडतात.भारतीय राज्यघटनेतील व्यापक मूलतत्त्वे, सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत याअनुषंगाने 'माझे संविधान,माझा अभिमान' उपक्रम राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, न्याय, लोकशाही, बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट व्हावी, या दृष्टिकोनातून #MyConstitutionMyPride हॅशटॅगखाली २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सदर उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंधलेखन, चर्चासत्र, पोस्टर निर्मिती, काव्य लेखन, घोषवाक्ये इ. विविध उपक्रम ऑनलाईन-ऑफलाईन राबविण्यात आल्याची माहिती शिक्षणविभागातर्फे देण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DWB2cu
via IFTTT

Post a Comment

0 Comments