'विधी'ची पात्रता अखेर निश्चित, बार काऊन्सिलकडून संभ्रम दूर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई तीन वर्षे आणि पाच वर्षे विधी पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षिणक अर्हता निश्चित असली, तरी त्यातील काही संदिग्धतेमुळे दरवर्षी प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांमध्ये वाद होत होते. यावर बार काऊन्सिलने स्पष्टीकरण तयार करून हा संभ्रम दूर केला आहे. यानुसार आता बारावीनंतर पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी; तर बारावीनंतर कायद्याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. विधी अभ्यासक्रम हा तीन वर्षे आणि पाच वर्षे अशा दोन प्रकारांत चालतो. तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी किमान शैक्षणिक आर्हता ही पदवी शिक्षणाची आहे. तर पाच वर्षे पदवीसाठी किमान बारावीची अट होती. तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी १०+२+३ असे करत पदवी मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे, दहावीनंतर किमान पाचवर्षे पदवी शिक्षण पूर्ण होणे अपेक्षित आहे. अनेक विद्यार्थी दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. इंजिनीअरिंगचे विद्यार्थी पदविका पूर्ण झाल्यानंतर इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षाच्या वर्गात प्रवेश घेतात आणि तीन वर्षे पदवी शिक्षण घेऊन पदवी मिळवतात. असे विद्यार्थी कायद्याच्या अभ्यासक्रमाला पात्र ठरतात. मात्र, जे विद्यार्थी दहावीनंतर डीएडसाठी प्रवेश घेतात. त्यातील काही विद्यार्थी दोन वर्षांनंतर बीएडच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेतात आणि शिक्षणशास्त्र पदवी प्राप्त करतात. मात्र, पदवी शिक्षणासाठी आवश्यक १०+२ नंतरचे तीन वर्षे पूर्ण करत नाहीत. यामुळे त्यांना विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देता येत नाही. यामुळे अनेक विद्यार्थी तक्रार करीत होते. परिणामी राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने बार कौन्सिलकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर कौन्सिलने स्पष्टीकरण दिले असून, यामुळे आता याबाबतचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ymqAt1
via IFTTT

Post a Comment

0 Comments