नाशिकमधील पहिली ते सातवीच्या शाळा १३ डिसेंबरपासून

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा खुल्या होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, सोमवार (दि. १३ डिसेंबर)पासून सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या महापालिका आयुक्त आणि महापालिका शिक्षण विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर शाळा भरविण्याबाबतचे नियम तातडीने संबंधित शाळांपर्यंत पोहोचविल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली असून, अनेकदा ठरवूनही खुल्या होऊ न शकलेल्या नाशिकमधील शाळा आता दीर्घ कालावधीनंतर खुल्या होणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार १ डिसेंबरपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली असली, तरी स्थानिक परिस्थितीची पाहणी करून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आला होता. त्यानुसार नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या लसीकरणाचा, तसेच पालकांच्या सहमतीचा तपशीलही सादर करण्यात आला. नाशिक महापालिका क्षेत्रात महापालिका व खासगी अशा दोन्ही मिळून पहिली ते सातवीच्या ५०४ शाळा आहेत. यामध्ये एक लाख ८५ हजार २७९ विद्यार्थी शिकत असून, चार हजार ७०९ शिक्षक आहेत. त्यापैकी ३०९ म्हणजे जवळपास ६१ टक्के शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत प्रतिसाद दिला असून, चार हजार २७० शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे या शाळांच्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. या बैठकीनंतर महापालिका शिक्षण विभागाचीही एक स्वतंत्र बैठक घेऊन शाळा सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्रशासनाधिकारी धनगर यांनी त्यासाठी एक स्वतंत्र परिपत्रक तयार करून ते महापालिका क्षेत्रातील शाळांना ऑनलाइन दिले आहे. शाळा सुरू करताना शाळा प्रशासनाने घ्यावयाची काळजी, करोनाबाबतचे नियम यासह सर्व सूचनांचा समावेश या परिपत्रकामध्ये करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील पहिले ते सातवीच्या शाळांची घंटा सोमवारी वाजणार आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील शाळांकडून माहिती मागविली होती. ६१ टक्के शाळांनी आमच्याकडे पालकांच्या सहमतीसह शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती पाठविली आहे. बहुतांश शाळांची तयारी पूर्ण झाली असून, उर्वरित शाळांना येत्या तीन दिवसांत सॅनिटायझेशनसह सर्व नियोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. -सुनीता धनगर, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण विभाग शहरातील पहिली ते सातवीच्या शाळांची सांख्यिकी आस्थापना शाळा विद्यार्थी शिक्षक महापालिका १०१ २३ हजार ४४० ७९९ खासगी ४०३ १ लाख ६१ हजार ८३९ ३ हजार ९१५ एकूण ५०४ १ लाख ८५ हजार २७९ ४ हजार ७०४


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33hosr4
via IFTTT

Post a Comment

0 Comments