CBSE Improvement Exam: बारावीत कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचे निर्देश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या श्रेणीसुधार परीक्षेसंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला निर्देश दिले आहेत. कोर्टाने सांगितले की बोर्डाने त्या विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, ज्यांनी यावर्षी आपल्या गुणांमध्ये वाढ होण्यासाठी श्रेणीसुधार परीक्षा दिली आणि तरीही त्यांना कमी गुण मिळाले. यामुळे त्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परीणाम होणार आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ गुणपत्रिकेच्या आधारे प्रवेश निश्चित केले आहेत. बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. श्रेणीसुधार योजनेनुसार, परीक्षा दिल्यानंतर गुण कमी मिळाले तर मूळ निकाल रद्द करू नये, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. हे असे विद्यार्थी आहे, ज्यांना एकतर श्रेणीसुधारमध्ये कमी गुण मिळाले आहेत किंवा ते अनुत्तीर्ण झाले आहेत. न्या. ए.एम. खानविलकर आणि सी.टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी घेतली. खंडपीठाने असे निर्देश दिले की अनेक उमेदवारांनी आपल्या आधीच्या गुणपत्रिकेनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतले आहेत आणि त्यांना श्रेणीसुधार योजनेत कमी गुण मिळाले आहेत. त्यांच्या पूर्वीच्या निकालात बदल केला जाऊ नये. सीबीएसईने दाखल केले प्रतिज्ञापत्र कोर्टात सीबीएसईने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. बोर्डाने हे स्पष्ट केले आहे की जे उमेदवार श्रेणीसुधार परीक्षेत अनुत्तीर्ण झालेत, पण आधी उत्तीर्ण झाले होते, ते आपल्या आधीची गुणपत्रिका कायम ठेऊ शकतात. मात्र, ज्यांना श्रेणीसुधार परीक्षेत कमी गुण मिळालेत, त्यांची खरी समस्या आहे, याकडे या विद्यार्थ्यांच्या वकीलाने लक्ष वेधले. या विद्यार्थ्यांनाही त्यांचे आधीचे अधिक असलेले गुण कायम ठेवू द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. एकूण ११ विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. या विद्यार्थ्यांना ही भीती आहे की सीबीएसईच्या १७ जून २०२१ च्या मूल्यांकन योजनेनुसार श्रेणीसुधार निकालानंतर आधीची गुणपत्रिका रद्द होईल. या विद्यार्थ्यांचे आधीचे गुण कायम ठेवावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईच्या वकिलांना दिले. खंडपीठाने असेही स्पष्ट केले की हे निर्देश केवळ या एका वेळेसाठी आहेत. हे कायमस्वरुपी निर्देश नाहीत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GBZgtA
via IFTTT

Post a Comment

0 Comments