शाळा पुन्हा कधी सुरू होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोनाविरोधी लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेल्या देशातील लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असून राज्यातील पात्र असलेल्या ९० टक्के नागरिकांना पहिली तर, ६२ टक्के नागरिकांना दुसरी लसमात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत आणखी १५ दिवसांनी आढावा घेऊन, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील असे टोपे यांनी जालना येथे सांगितले. त्यामुळे शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञांचा रेटा सुरू असला तरी अद्याप याबाबतचा निर्णय अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असली तरी, मृत्युदर खूप कमी असल्याची दिलासादायक बाब दिसत आहे. लसीकरणामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळेच सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे. लसीकरणाला एक वर्ष पूर्ण होत असून, आता उद्दिष्टपूर्ती आवश्यक आहे, असे ते म्हणाले. राज्यातील एकूण बाधितांची संख्या सध्या सुमारे दोन लाख ६५ हजार आहे. त्यापैकी ८६ ते ८७ टक्के व्यक्ती या गृहविलगीकरणात आहेत. त्यांना तापासारखी सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्याला एकूण ६० लाख कोव्हॅक्सिनच्या लसमात्रांची गरज आहे. आघाडीच्या व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बूस्टरमात्राही लागेल. त्यासाठी महिनाभर पुरेल इतक्या लससाठ्याची तरतूद असावी, याची तयारी करत आहोत. याबाबत केंद्र सरकारला माहिती दिली आहे, असे ते म्हणाले. राज्याला कोव्हिशिल्डच्या ५० लाख व कोव्हॅक्सिनच्या ४० लाख मात्रा उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तिसऱ्या लाटेचा धोका दिसू लागताच राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुलांसाठी शाळा प्रत्यक्ष सुरू असणे आवश्यक असल्याची भूमिका राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ मांडत आहेत. मात्र, तूर्त शाळा बंदच राहणार असून १५ दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे ते म्हणाले. 'लसीकरणाला वेग देणे गरजेचे' केंद्र सरकारने राज्याला कमी लसपुरवठा केल्याचे मी कधीही बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. १५ ते १८ वयोगटास आपण प्राधान्यक्रमाने घेतले आहे. त्यासाठी राज्यात आपण रोज आठ लाख लसमात्रा देत असून त्यानुसार राज्याने केंद्राकडे मागणी नोंदवली आहे. करोना लसीकरणात राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, अद्यापही प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणाला वेग देणे आवश्यक आहे, असे टोपे म्हणाले. रुग्णालयाशी चर्चा ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगशेकर यांच्या प्रकृतीबाबत संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली आहे. लतादीदींची प्रकृती सध्या स्थिर आहे. याबाबत त्या रुग्णालयाचे प्रसिद्धीप्रमुख अधिक माहिती देतील, असे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33CxHCi
via IFTTT

Post a Comment

0 Comments