मेडिकल पीजीच्या जागा वाढल्या; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवीसाठीच्या (Medical PG Seats) शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या प्रवेशासाठी राज्याच्या कोट्यामध्ये ९२ जागांची वाढ झाली आहे. यामुळे यंदा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळणार आहे. वैद्यकीय पदवी शिक्षण झाल्यानंतर पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र त्या तुलनेत जागा कमी आहेत. परिणामी दरवर्षी या प्रवेशासाठी चांगलीच चुरस निर्माण व्हायची. पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी जागा वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र करोनाकाळात अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा वाढविण्यात आल्या. याचबरोबर आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भरतीही करण्यात आली. याचदरम्यान आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून अनेक प्राध्यापकांना पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठीची मान्यताही मिळाली. या सर्वांचा परिणाम म्हणून यंदा जागा वाढल्याचे सांगितले जात आहे. सध्या राज्यात पदव्युत्तर पदवीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये २,४११ जागा आहेत. यापैकी १,२०७ जागा केंद्रीय कोट्यासाठी राखीव आहेत; तर १,२०३ जागा राज्याच्या कोट्यातील आहेत. राज्याच्या कोट्यातील १,२०३ व खासगी रुग्णालयांमधील ६७६ जागांची प्रवेश प्रक्रिया राज्य प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून पूर्ण होते. या दोन्ही मिळून यंदा राज्यात १,८७९ जागा आहेत, तर गतवर्षी १,७८७ जागा होत्या. यामध्ये आता ९२ जागा वाढल्या आहेत. शिवाय अभिमत विद्यापीठांमध्ये सुमारे ४००हून अधिक जागा पदव्युत्तर पदवीसाठी आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचबरोबर सध्या काही जागांसाठी न्यायालयात लढा सुरू आहे. याचा निकाल आल्यास त्या जागांचाही यामध्ये समावेश होऊ शकतो, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी असलेले नियम अधिक कठोर आहेत. ३० खाटांचे रुग्णालय असेल तर तेथे एक पदव्युत्तर पदवी अध्यापनासाठी पात्र डॉक्टर शिक्षक आणि त्याला दोन विद्यार्थ्यांना शिकविण्याची मान्यता देण्यात येते. ४० खाटांचे रुग्णालय असेल तर पदव्युत्तर पदवी अध्यापनासाठी पात्र डॉक्टर शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थी शिकू शकतात. तसेच एक पात्र शिक्षक म्हणजे पदव्युत्तर पदवीनंतर ज्यांना किमान पाच वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे असा डॉक्टरच पदव्युत्तर पदवीसाठी अध्यापन करू शकतो. यातच करोनाकाळात अनेक वर्षांतून प्रथमच पालकमंत्र्यांनी त्यांच्या निधीतून दहा कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम रुग्णालयांना दिली. त्यातून रुग्णालयांत खाटा वाढविण्यापासून ते पायाभूत सुविधांची कामे झाली. याचबरोबर या काळात झालेली भरती, या सर्वांचा परिपाक म्हणून या जागा वाढल्याचे दिसत असल्याचे निरीक्षण आरोग्य शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी नोंदविले. 'पदव्युत्तर पदविका'च्या जागाही पदवीसाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पदव्युत्तर पदविका शिक्षण देणाऱ्या कॉलेजांमध्ये पात्र शिक्षक उपलब्ध होऊ लागल्याने ही कॉलेजही पदवी शिक्षणासाठी पात्र झाली आहेत. यामुळे त्या जागाही पदवी शिक्षणासाठी उपलब्ध झाल्या आहेत, असे डॉ. प्रवीण शिनगारे म्हणाले. याचा फायदा नक्कीच राज्यातील विद्यार्थ्यांना होईल, असेही त्यांनी नमूद केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nXP4oy
via IFTTT

Post a Comment

0 Comments