अन्न-पाणी दुरापास्त, २५ किमी पायपीट; युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे हाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली रशियाने लादलेल्या युद्धामुळे () युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. बॉम्बहल्ल्यांपासून वाचण्यासाठी बंकरमध्ये राहावे लागत असलेल्या या विद्यार्थ्यांना अन्न, पाण्याच्या तुटवड्याला () सामोरे जावे लागत आहे. भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बसने प्रवास करून आणि नंतर २५ किमी चालत शेजारील रोमानियाच्या सीमेवर पोहोचल्यानंतर कडाक्याच्या थंडीत दोन दिवस उघड्यावर घालवावे लागले. रशियाच्या फौजांनी ईशान्य युक्रेनमधील खारकिव्ह शहराला वेढा घातल्याने त्याचा फटका तेथील भारतीय विद्यार्थ्यांनादेखील बसू लागला आहे. खारकिव्हमध्ये वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बंकरमध्ये राहावे लागत असलेल्या या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि पाण्याची कमतरता असल्याने प्यायच्या सोड्यासाठी लांबलचक रांगा लावाव्या लागत आहेत. बॉम्बहल्ले सुरू असताना जीव धोक्यात घालून अन्नपदार्थ आणण्यासाठी बाहेर जावे लागत असल्याचे अनुभव महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. अन्न-पाण्यावाचून बिकट परिस्थिती ओढवण्यापूर्वी युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्याचे आवाहन या विद्यार्थ्यांनी भारत सरकारला केले आहे. मूळचा पालघरचा असलेला हृतिक बापुलोहार दोन महिन्यांपूर्वीच खारकिव्ह शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी गेला आहे. त्याने सांगितले, 'गेल्या चार दिवसांपासून आम्ही सुमारे ५०० विद्यार्थी दोन बंकरमध्ये राहत आहोत. येथील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. मी भारत सरकारला आवाहन करतो की, आम्हाला तातडीने येथून बाहेर काढावे.' सांगलीतील ऐश्वर्या पाटील म्हणाली, 'आमच्या वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा साठा संपला असल्याने आम्ही पिण्यासाठी सोड्याचा वापर करीत आहोत. त्यासाठीदेखील आम्हाला दोन-दोन किमी लांबीच्या रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे.' पंजाबमधील सुमारे ५०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला सांगितले. कडाक्याच्या थंडीत दोन दिवस उघड्यावर मध्य प्रदेशातील इंदूर येथील कामिनी शर्मा यांचा मुलगा विभोर (२२) युक्रेनमधील टेर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. 'माझा मुलगा कसा तरी टेर्नोपिलहून रोमानियाला जाण्यासाठी बसमध्ये चढला. पण, वाटेत काही अडचण आल्याने त्याला बसमधून खाली उतरावे लागले. त्यानंतर रोमानियाची सीमा गाठण्यासाठी त्याला अन्य भारतीय मित्रांसोबत तब्बल २५ किमी अंतर चालत जावे लागले. रोमानियाच्या सीमेवर जमलेल्या या विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये दोन दिवस मोकळ्या आकाशाखाली राहावे लागले; कारण त्यांना रोमानियामध्ये तत्काळ प्रवेश दिला गेला नाही', अशी माहिती कामिनी शर्मा यांनी दिली. दूतावासाच्या अधिकाऱ्यांमुळे त्रासमुक्त प्रवास बेंगळुरू : युक्रेन तसेच हंगेरी आणि स्लोव्हाकिया येथील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे युद्धग्रस्त युक्रेनमधून बेंगळुरूला परतलेले भारतीय म्हणाले की, त्यांचा प्रवास त्रासमुक्त झाला. यामध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. युक्रेनच्या पश्चिम भागावर अद्याप युद्धाचा मोठा परिणाम झालेला नाही. या भागातील भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने मायदेशी परतले आहेत. शेजारील देशांच्या सीमांपर्यंत नेण्यासाठी पाच बसची व्यवस्था करण्यात आली होती, असे मोहम्मद शोएब आणि प्रतिक नागराज या विद्यार्थ्यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5dS1eC3
via IFTTT

Post a Comment

0 Comments