ऑनलाइन निवडणूक शक्य! 'सीओईपी'च्या विद्यार्थ्यांनी बनवले पोर्टल

पुणे : निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही अडथळ्यांशिवाय राबवणे शक्य असल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. 'सीओईपी'च्या विद्यार्थ्यांनी निवडणुकीसाठी ऑनलाइन पोर्टल तयार करून त्याद्वारे 'सीओईपी'तील विद्यार्थी निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे हे पोर्टल 'हॅक प्रूफ' करण्यात आले आहे. या पोर्टलचा वापर भविष्यात अनेक संस्था, संघटना आणि छोट्या पातळीवरच्या निवडणुकांसाठी केला जाऊ शकणार आहे. 'सीओईपी'मध्ये दर वर्षी 'जनरल सेक्रेटरी' आणि 'गॅदरिंग सेक्रेटरी' या पदांसाठी निवडणुका होतात. महाविद्यालयातील विद्यार्थी मतदान करून उमेदवाराची निवड करतात. आतापर्यंत या निवडणुका संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ईव्हीएम मशिनद्वारे करण्यात येत होत्या. करोनामुळे कॉलेज बंद झाल्याने निवडणुका कशा घ्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला. कॉलेजमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्लबच्या विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी उचलली आणि निवडणुकीसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले. सहा महिन्यांच्या कालावधीत या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर क्लबच्या प्रणव जोगळेकर, वासू शर्मा, अर्चिशा शुक्ला, आशुतोष परदेशी, समीर कवठेकर या विद्यार्थ्यांनी या पोर्टलची निर्मिती केली असून, त्यांना अनिकेत जयतीर्थ आणि दिपिका गोयल यांनी सहकार्य केले आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना डॉ. तनुजा पतनशेट्टी व प्रा. प्रद्युम्न धामणगावकर यांनी मार्गदर्शन केले आहे. या पोर्टलसाठी मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम (एमआयएस) ही संकल्पना वापरण्यात आली आहे. 'सीओईपी'च्या सर्व्हरवर विद्यार्थ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला. या डेटाबेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅकएंड प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 'सीओईपी'मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा एक 'पीआरएन' नंबर आहे. त्या नंबरद्वारे विद्यार्थ्यांना लॉग इन पासवर्ड देण्यात आले. विद्यार्थ्याने एकदा 'लॉग इन' करून मतदान केले, की पुन्हा त्याला मतदान करता येणार नाही, अशी व्यवस्था केल्याने मतदान केलेल्या जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी एकदाच मत दिल्याचे सिद्ध झाले. एखादा विद्यार्थी जर दोन वेळा मतदान करायला गेला तर तो दुसऱ्यांदा 'लॉग इन' करूच शकत नसल्याने मतदान पारदर्शक पद्धतीने झाले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये निकाल तयार करून प्रसिद्ध करण्यात आला. निवडणुकीचा अर्ज भरणे, कागदपत्रे डाउनलोड करणे, अर्ज मागे घेणे, ऑनलाइन प्रचार, प्रत्यक्ष मतदान आणि निकाल एकाच पोर्टलद्वारे होत असल्याने हा पर्याय भविष्यात अनेक संघटना संस्थांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले. पोर्टलची वैशिष्ट्ये - संपूर्ण निवडणूक पद्धती ऑनलाइन पद्धतीने पार पाडण्यासाठी उपयुक्त. - मतदारांचा डेटाबेस सर्व्हरवरून पोर्टलशी कनेक्ट करण्याची सुविधा. - मतदार कायमस्वरूपी नोंदणी क्रमांकाद्वारे ओळखले जाणार. - पीआरएन क्रमांक, आधार नंबर, पॅन क्रमांक अशा कोणत्याही क्रमांकाद्वारे निवडणूक घेणे शक्य. - मतदाराने लॉग इन केल्यानंतर एकदाच मतदान करण्याची संधी. ऑनलाइन निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या संकल्पनेतून या पोर्टलची निर्मिती झाली. ऑनलाइन मतदान प्रक्रिया 'हॅक' होऊ नये या भीतीने विशेष तयारी करण्यात आली होती. कायमस्वरूपी नोंदणी क्रमांकाने ऑनलाइन निवडणूक घेता येणे शक्य असून, अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते. - प्रणव जोगळेकर, विद्यार्थी, सीओईपी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mFG8sTt
via IFTTT

Post a Comment

0 Comments