Women's Day 2022: शिक्षिकेच्या कल्पकतेतून शिक्षण साखळी, विद्यार्थ्यांना मिळाला आधार

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतात. करोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून दोन शिक्षिकांनी पुढाकार घेतला. सजग तरुण-तरुणी आणि पालकांची मदत घेऊन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साखळी तयार केली. आज महिलादिनानिमित्त त्यांच्या कार्याची माहिती घेऊया. करोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे (Online Education) विद्यार्थी गळतीचा धोका होता. प्रत्यक्ष वर्ग भरणे शक्य नव्हते. शिक्षकांना गावात जाणे शक्य नव्हते. अशा वेळी गावातील सजग तरुण-तरुणी, पालकांची मदत घेऊन दोन शिक्षिकांनी शिक्षणाची साखळी () तयार केली. आपल्या वर्गातील मुलांबरोबर बाहेर गावात वरच्या वर्गात शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांचाही अभ्यास घेऊन त्यांची शैक्षणिक प्रगती कायम राहील याची काळजी घेतली. करोनामुळे दोन वर्ष शाळा प्रत्यक्ष बंद राहिल्या. प्राथमिक शाळा तर सुरूच होऊ शकल्या नव्हत्या. ऑनलाइन शिक्षणाचा सरकारने आग्रह धरला; परंतु ग्रामीण भागात मुलांकडे मोबाइल नसणे, इंटरनेट जोडणी नसणे अशा अडचणींमुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले. अशा काळात अनेक शिक्षकांनी प्रयत्न करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. गारखेडा गटातील आपतगाव येथील शाळेतील मुख्याध्यापिका प्रमिला साक्रुडकर, सहशिक्षक अनिता उसरे यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिलेच त्याचबरोबर गावातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होऊ शकली. ऑनलाइन शिक्षणाबाबत साक्रुडकर, उसरे यांनी सर्वे केला अन् लक्षात आले, की अनेकांकडे मुलांकडे मोबाइल नाही. पालक शेतात कामाला गेले, तर मोबाइल कोण देणार, अशा वेळी गट पद्धतीवर भर देण्यात आला. वेगवेगळे गट तयार करून थेट अभ्यासक्रम सुरू केला. मंदिर, अंगणात, शालेय परिसरात विद्यार्थ्यांचे गट अभ्यासाला बसत. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, शैक्षणिक साहित्य, फळा, खडू यासह पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. अवांतर वाचानावर ही भर देण्यात आला. गावातील पालक, अकरावी, बारावी, उच्चशिक्षित तरुण- तरुणी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यासाठी पुढे आले. पाहता पाहता पालकमित्र, विषय मित्र तयार झाले अन् अभ्यासक्रमाचे वेळापत्रक ठरत गेले. त्यानुसार अभ्यासक्रमातील लेखन, वाचनासह विविध उपक्रम सुरू झाले. इयत्तानिहाय उपक्रम निश्चित करण्यात आले. गावातील पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही पुढे आला. अशावेळी त्या विद्यार्थ्यांनाही यात सहभागी करून त्यांचा अभ्यास घेण्यात येत होता. उपक्रमांचा परिणामही समोर आला. करोना काळात शिक्षण विभागाने केलेल्या अध्ययन स्तरामध्ये शाळा जिल्ह्यातील पहिल्या दहा शाळांमध्ये आहे. वर्तमानपत्रातील सफर, आजीबाईंचा बटवा.. गावात वर्तमानपत्र सुरुवातीला येत नव्हते. अशा वेळी जुने वर्तमानपत्र जमा करून त्यातील महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, वाचन वाढावे यासाठी ‘वर्तमानपत्रातील सफर’ उपक्रम राबविण्यात आले. यातून विविध विषयांवर माहितीचे वाचन केले जायचे व प्रश्न विचारले जायचे. प्रश्ननिर्मिती कौशल्य निर्माण व्हावे असाही हेतू होता. आरोग्याबाबत 'आजीबाईचा बटवा' उपक्रम घेण्यात आला. यामध्ये ग्रामीण भागातील औषधी वनस्पती, त्याचे कार्य, उपयोग यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत होती. करोनाकाळात ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. गावात सर्व्हे केला असता ऑनलाइन शिक्षण शक्य होणार नसल्याचे लक्षात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सरपंच, गावकऱ्यांशी चर्चा केल्याचे आपतगाव-२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला साक्रुडकर यांनी सांगितले. गट पद्धतीने शिक्षणाचा पर्याय आला. शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने गावात अनेक गट केले, आठवड्यातून एक-दोनवेळा जात अभ्यासक्रम देणे, सराव, प्रश्न याची तयारी, विविध उपक्रम हाती घेतल्याचे त्या म्हणाल्या. यासोबतच पालकमित्र, विषयमित्र नेमल्याने त्यांची खूप मदत झाली. आमच्याच शाळेतील परंतु पुढील शिक्षणासाठी इतर शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न आला. त्यांची शैक्षणिक प्रगती कायम रहावी यासाठीही प्रयत्न झाले. याचा परिणाम असा झाला की, गळतीचे प्रमाण थांबले, शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर आमचा पट वाढल्याचे त्या सांगतात. ऑनलाइन शिक्षण शक्य नसल्याने गट पद्धतीने अभ्यासक्रम सुरू केला. आठवड्यातून दोन दिवस शाळेत जाऊन अभ्यासगटाला भेट द्यायचो, पुढील नियोजन समजून सांगितला जायचा. नवनवीन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आनंददायी वाटत गेल्याचे सहशिक्षिका अनिता उसरे यांनी सांगितले. करोना काळात अनेक वरिष्ठांनी शाळेला भेट देत पाहणी केली, विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या पुढाकारातून हे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mVGWSBE
via IFTTT

Post a Comment

0 Comments