कसे मिळणार भूगोलाचे गुण? तज्ज्ञांनी सुचवले पर्याय

म. टा. प्रतिनिधी, नागपूर दहावीच्या परीक्षेतील भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी या पेपरचे गुण विद्यार्थ्यांना कशाप्रकारे देणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. बेस्ट ऑफ फाइव्हच्या निकषाच्या आधारे हे गुण देणार की आणखी कुठली उपाययोजना केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी दहावीच्या परीक्षेतील गुरुवारचा पेपर रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, या पेपरचे गुण कसे देणार, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. याकरिता विविध शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी सरकारला पर्याय सुचवले आहेत. दहावीच्या गुणपत्रिकेत ६०० गुणांऐवजी ५५० गुणांनी टक्केवारी काढली जावी, बेस्ट ऑफ फाइव्हच्या आधारे निकाल लावण्यात यावा किंवा इतर विषयांतील गुणांच्या आधारे सरासरी काढून त्याआधारे भूगोलाच्या पेपरचे गुण दिले जावेत, असे विविध पर्याय सुचविण्यात आले आहेत. याबाबत राज्य मंडळात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. भूगोलाचे गुण कसे निश्चित करावेत, यासंदर्भात राज्य मंडळाकडून आदेश आलेले नाहीत. मात्र, लवकरच ते येतील आणि त्यानंतर यासंदर्भात सगळे स्पष्ट होईल, असे नागपूर विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सांगितले. अडकले पेपर तपासणीचे काम बारावी आणि दहावीच्या शालांत परीक्षांच्या पेपर तपासणीवर लॉकडाउनचा परिणाम झाला आहे. बारावीच्या पेपर तपासणीचे काम काही प्रमाणात मार्गी लागले असले तरी दहावीच्या तपासणी कामांना चांगलीच खीळ बसली आहे. करोनामुळे लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी बारावीचे पेपर्स तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. या पेपर्सची तपासणी आणि पुनर्तपासणी बऱ्याच प्रमाणात झालेली आहे. एकूण पेपर्सपैकी ६० टक्के पेपर्स नागपूर विभागीय मंडळाच्या कार्यालयात जमादेखील करण्यात आले आहेत. तरीही अद्याप ४० टक्के पेपर्स मंडळाकडे यावयाचे आहेत. दहावीच्या पेपर्सच्या तपासणीचे काम मात्र बरेच मागे पडले आहेत. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे विविध विषयांचे पेपर्स अडकून पडले आहेत. यातील काही विषयांचे पेपर्स तर अद्यापही शाळास्तरावरच अडकून आहेत. लॉकडाउनच्या काळात त्यांची वाहतूक शक्य न झाल्याने या पेपर्सच्या तपासणीचे काम रेंगाळले आहे. दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्गांचे निकालही यामुळे यंदा उशिराने लागणार आहेत. याचा परिणाम यंदाच्या प्रवेशप्रक्रियांवर होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3a6rCLR
via IFTTT

Post a Comment

0 Comments