शिक्षणापासून दूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे

म. टा. प्रतिनिधी, करोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह केला जातो खरा; परंतु बेताची परिस्थिती, पूरक वातावरण यामुळे ऑनलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचणे अवघड आहे. हे लक्षात घेऊन पुंडलिकनगर पोलिस स्टेशनने सेवानिवृत्त शिक्षकांच्या पुढाकाराने परिसरातील विद्यार्थ्यांना 'स्पोकन इंग्लीश' व इंग्रजी व्याकरणाचे धडे देणे सुरू केले आहे. कोविड-१९ संसर्ग काळात सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. त्यातील काहींनी ऑनलाइन शिक्षणाची सोय करण्याचा प्रयत्न केला पण, हे शिक्षण कसेबसे ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. इतर विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासापासून वंचित होते. मग कधी कोणाला मोबाइल फोन नव्हता, कधी रेंज नसायची, अशा अनेक अडचणी आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून प्रत्यक्षात शाळा, महाविद्यालय सुरू नव्हते. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून पुंडलिकनगर परिसरात 'कम्युनिटी पोलिसिंग'या उपक्रमातून या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी परिसरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण, 'स्पोकन इंग्लीश'शिकविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याबाबत त्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. पी. जवळकर यांना ही बाब सांगितली, त्यांनीही शिकविण्याचे मान्य केले. 'कम्युनिटी पोलिसिंग'अंतर्गत गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना या शिकवणीसाठी पाचारण केले व हा उपक्रम सुरू केला. सोनवणे यांनी स्वतःच्या मुलाला देखील या वर्गात सहभागी करून घेतले. दोघांच्या पुढाकाराने रविवारी या वर्गाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्याच हस्ते दीपप्रज्ज्वलन करून हा वर्ग सुरू करण्यात आला. मुलांना वह्या, पेन, मास्क, सॅनिटायझर पोलिस स्टेशनतर्फे पुरविण्यात आले. जवळकर यांनी तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरक्षित वावर, आरोग्याचे सगळे नियम पाळून विद्यार्थ्यांचा हा पहिल्या दिवशीचा वर्ग घेण्यात आला. यावेळी नुमान खान व पुंडलिकनगर पोलिस स्टेशनचे मदन गुसिंगे हजर होते. पहिल्या दिवशी १२ विद्यार्थी या उपक्रमासाठी परिसरात विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. ज्यांच्याकडे कोणतीही ऑनलाइन शिक्षण घेण्याची सुविधा नाही, असे विद्यार्थी मदन गुसिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निश्चित केले. असे १२ विद्यार्थी आढळले. पहिल्या दिवशी हे विद्यार्थी वर्गाला उपस्थित होते. पुढे विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपासासाठी वेगवेगळ्या राज्यात जात होतो त्यावेळी केरळ, कर्नाटक, तमीळनाडू व आंध्रप्रदेश या भागातील अधिकारी इंग्रजीतून बोलायचे. मी मात्र, त्यांच्याशी हिंदीत बोलायचो, असे प्रसंग आयुष्यात या तरुण मुलांसमोर येऊ नयेत म्हणून 'कम्युनिटी पोलिसिंग'च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी हे वर्ग सुरू केले आहेत. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल. -घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nYoCcd
via IFTTT

Post a Comment

0 Comments