तंत्रशिक्षणाच्या अडीच लाख जागा घटल्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये अवघ्या १७१ नवीन संस्थांना मान्यता देण्यात आली आहे, तर १७९ संस्थांचे कॉलेज बंद करण्याचे प्रस्ताव परिषदेकडे आले आहे. यात राज्यातील २२ संस्थांचा समावेश आहे. संस्था बंद होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने सुमारे अडीच लाख जागा घटल्याचेही परिषदेच्या माहितीत समोर आले आहे. इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट शिक्षण संस्थांना मान्यता देणाऱ्या 'एआयसीई'ने शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये एकाही नवीन पारंपरिक कॉलेजला परवानगी देण्यात येणार नसल्याचे धोरण दोन वर्षांपूर्वीच स्वीकारले होते. यानुसार यंदा नवीन आणि मागणी असलेले अभ्यासक्रम शिकविणाऱ्या देशातील १७१ नवीन शिक्षण संस्थांना कॉलेज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात सरकारी संस्थांचा समावेश असल्याचे निरीक्षण परिषदेकडून नोंदविण्यात आले आहे. मान्यता मिळालेल्या नवीन शिक्षण संस्थांमध्ये राज्यात सात नवीन शिक्षण संस्था सुरू होणार आहेत. यात व्यवस्थापन शिक्षणाची पाच, तर इंजिनीअरिंगची दोन कॉलेजे असणार आहेत. इंजिनीअरिंग आणि फामर्सीमध्ये २०२२पर्यंत एकाही नवीन कॉलेजला परवानगी देण्यात येणार नाही, असे धोरण परिषदेने स्वीकारले असल्यामुळे खासगी संस्थांनी अर्ज केला नाही. यामुळे सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या बहुतांश कॉलेजांचे अर्ज आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. तर इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त राहत असल्यामुळे बहुतांश संस्थांनी कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये देशातील सुमारे १७९ संस्थांनी कॉलेज बंद करण्याचा, तर ७६२ संस्थांनी जागा कमी करण्याचे प्रस्ताव परिषदेकडे सादर केले होते. यामुळे तंत्रशिक्षणातील सुमारे दोन लाख ६३ हजार २४४ जागा कमी झाल्या आहेत. यामध्ये राज्यातील २२ संस्थांनी कॉलेज बंद करण्यासाठी अर्ज केले आहेत. तर ९५ संस्थांना जागा रिक्त करण्याची परवानगी देण्यात आल्याचे परिषदेच्या माहितीतून समोर आले आहे. यामुळे राज्यातील सहा हजार ५८६ जागा कमी होणार आहेत. राज्यातील १६ संस्थांना परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही किंवा त्यांनी निकषांचे उल्लंघन केले आहे. अशा संस्थांतील एक हजार १७ जागाही कमी झाल्या आहेत. एमबीएच्या संस्थांना मागणी इंजिनीअरिंग तसेच फार्मसी कॉलेजांमधील जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे यंदा एमबीएच्या कॉलेजांना मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे. तर इंजिनीअरिंगमध्ये पारंपरिक शाखांऐवजी आर्टीफिशीअल इंटलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश असलेल्या शाखांच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. राज्यात १७८ संस्थांना जागा वाढविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे १४ हजार ६४९ जागा वाढल्याचेही परिषदेच्या माहितीत समोर आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KthtSZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments