'फेरपरीक्षेतील उत्तीर्णांना डिप्लोमासाठी संधी द्या'

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेत (पुरवणी परीक्षा) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्याप जाहीर झाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची अजूनही प्रतीक्षाच आहे. त्यामुळे डिप्लोमा प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रवेश फेरी राबवण्याची मागणी राज्यातील संस्थाचालकांकडून करण्यात आली आहे. दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाते. त्यासाठी विशेष फेरी; तसेच समुपदेशन फेरी घेण्यात येते. त्यानुसार दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयटीआय आणि अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत सामावून घेण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमा, तर बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटिंग, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अजूनही संधी देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर पुरवणी परीक्षेतील दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी विशेष फेरी किंवा समुपदेश फेरी राबवण्याची मागणी असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ नॉन एडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया या संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. 'डीटीई'च्या निर्णयाकडे लक्ष पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी न मिळाल्यास संस्थांतील अनेक जागा रिक्त राहातील. प्रवेश फेरी न घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या सर्वांचा विचार करून समुपदेशन फेरी आणि स्वतंत्र प्रवेश फेरी घ्यावी, असे प्रा. झोळ यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे 'डीटीई'कडून याबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2L1FEb7
via IFTTT

Post a Comment

0 Comments