अभ्यासक्रम एका छत्राखाली; मुंबई विद्यापीठात 'स्कूल' संकल्पना

मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात होत आहे. विद्यापीठ पातळीवर विविध विषयांना एका छत्राखाली आणन्यासाठी राबवली जाणार आहे. विविध विद्याशाखाअंतर्गत असणाऱ्या विषयांची ओळख आणि ते विषय शिकण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल. याअंतर्गत स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, स्कूल ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ पर्फॉर्मिंग आर्ट्स अशा विविध स्कूल्सची स्थापना करण्यासाठी आजच्या विद्या परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. त्याचबरोबर अधिकाधीक विद्यार्थ्यांमध्ये एनसीसी बाबत जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांचा राष्ट्रसेवेमध्ये सहभाग वाढावा यासाठी आजमीतीस ज्या-ज्या महाविद्यालयात एनसीसी युनिट आहेत त्या-त्या महाविद्यालयात एनसीसी हा वैकल्पिक विषय म्हणून सुरु करण्यासाठीही मंजूरी देण्यात आली आहे. सुमारे ६८ महाविद्यालयात एनसीसी युनिट्स आहेत. मुंबई विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सागरी अध्ययन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्र या दोन्ही नविन केंद्राच्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. सागरी अध्ययन केंद्रामार्फत एम.ए. मेरिटाईम स्टडीज, एम.कॉम. मेरिटाईम स्टडीज आणि एमएस्सी मेरिटाईम स्टडीज यासह पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्रामार्फत एम.ए. आणि पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. लोकमान्य टिळक अध्यासन केंद्रामार्फत या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम, खगोलशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम, गीतारहस्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांना मंजूरी देण्यात आली आहे. भौतिकशास्त्र विभागाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘व्हर्च्युअल सेंटर ऑफ एक्सलेंस इन थेरॉटिकल अँड कम्प्युटेशनल फिजिक्स’ या केंद्राच्या स्थापनेस मंजूरी मिळाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखाअंतर्गत अभियांत्रिकीच्या शिक्षणात आमुलाग्र बदल घडून येणार आहेत. क्षेत्रीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याच्या एआयसीटीच्या शिफारशीलाही आजच्या विद्या परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालयांमध्ये लवकरच मराठी भाषेमध्ये अभियांत्रिकेचे धडे गिरवले जाणार आहेत. त्याचबरोबर औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या आठ शाखांमध्ये उद्योन्मुख नवीन विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड डेटा सायन्स, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (डेटा सायन्स), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्ल्युडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी) अशा अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्यवाढीसाठी तथा विशेष क्षेत्रात प्राविण्य संपादीत करण्यासाठी विद्यापीठात पहिल्यांदाच संशोधनात्मक क्षेत्रीय केस स्टडीजचा समावेश करण्यात येणार आहे. वाणिज्य विद्याशाखेअंतर्गत बीएमएस, बीएएफ आणि बीबीआई या अभ्यासक्रमांच्या चौथ्या सत्रात क्षेत्रीय केस स्टडीज सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ३० तास आणि २ क्रेडिट बहाल केले जाणार आहेत. तसेच विज्ञान शाखेअंतर्गत वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांसाठी आणि मानव्यविद्याशाखांतर्गत अर्थशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र विषयांसाठीही क्षेत्रीय केस स्टडीज सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि इतर सर्व घटकांना लक्षात घेऊन त्याचबरोबर शैक्षणिक वर्षाची घडी सुरळीत बसविण्यासाठी शैक्षणिक सत्र निश्चित करण्यात आले आहे. यानुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी १४ जून ते ३० ऑक्टोबर २०२१ प्रथम सत्र, १५ नोव्हेंबर ते ०१ मे २०२२ दुसरे सत्र निश्चित करण्यात आले असून यामध्ये दिवाळी, नाताळ, आणि गणपती सणांच्या सुट्ट्यांचेही विशेष नियोजन करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात १२ जून २०२२ पासून होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यान्वये विद्यापीठातील विविध विभाग, संस्था, स्कूल यांना स्वायत्तता प्रदान करण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत असून, याद्वारे शैक्षणिक स्वातंत्र्य, अभ्यासक्रमांतील लवचिकता आणि इतर अनुषंगिक बाबीसाठी विविध समित्या तयार केल्या जाणार आहेत. यामाध्यमातून शैक्षणिक, वित्तीय आणि सामान्य प्रशासन याबाबींवर विशेष लक्ष दिले जाणार असून गतिमान आणि कार्यक्षम प्रशासनावर विशेष भर दिला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qAGw6V
via IFTTT

Post a Comment

0 Comments