पालिकेच्या शाळांतील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅब

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे महापालिकेच्या शाळांमधील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. त्याचबरोबर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी रोख मोबदला देऊन भूसंपादनालाही मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब पुरविण्याचा प्रस्ताव माजी उपमहापौर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिला होता. हा ठराव स्थायी समितीने संमत केला. पुणे महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अंदाजे एक लाख विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये इयत्ता चौथी ते आठवीमध्ये सुमारे ३८ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला करोनाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. करोनामुळे शाळाही प्रत्यक्ष न चालता ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ४३ टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाची कोणतीही व्यवस्था नसल्याचे शिक्षण विभागानेच स्पष्ट केले आहे. वास्तविक ८० टक्के मुलांकडे अशी कोणतीही व्यवस्था नाही, असे डॉ. धेंडे यांनी प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट सुविधेसह टॅब पुरविण्यात यावेत. गतवर्षी गणवेश, दप्तर, रेनकोट, बूट, स्वेटरसाठी 'डीबीटी'मार्फत विद्यार्थ्यांना हस्तांतरित केली जाणारी सुमारे १७ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेकडे शिल्लक आहे. त्यातूनच 'टॅब'साठी तरतूद करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे डॉ. धेंडे यांच्या प्रस्तावात नमूद आहे. 'मेट्रो'साठी भूसंपादनाला मान्यता 'हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या आराखड्यातील बदलांना मान्यता देण्याविषयीचा प्रस्तावही स्थायी समितीने मंजूर केला. या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रसंगी रोख मोबदला देऊन करण्यात येईल. टीडीआर, एफएसआय देऊन ज्या जागा ताब्यात घेता येणार नाहीत, त्यांच्या भूसंपादनासाठी येणारा खर्च महापालिका उचलणार आहे. यासाठी पाच ते सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,' असे हेमंत रासने यांनी नमूद केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iH8mN2
via IFTTT

Post a Comment

0 Comments