करिअरनिवडीत पालकांची भूमिका

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर परीक्षांची भीती विद्यार्थ्यांना आणि निकालाची भीती पालकांना हे चित्र नेहमी बघायला मिळते. परंतु यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण परीक्षा आणि निकालाची भीती या दोन्हींपासून विद्यार्थी आणि पालकवर्गाची सुटका झाली आहे. परीक्षा न घेता समाधानकारक निकाल लागले असले, तरी केवळ मार्कांच्या आधारावर विशिष्ट करिअर निवडण्याची जुनी सवय अजूनही गेलेली नाही. थोडक्यात करिअर निवडीबाबत असलेला पारंपरिक दृष्टिकोन अजूनही बघायला मिळतो. तुमच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी चांगले मार्क आवश्यक असले, तरी ही नाण्याची केवळ एकच बाजू आहे हे विसरून चालणार नाही. अशी अनेक उदाहरणं बघण्यात आली आहेत, ज्यात चांगले गुण न मिळवता योग्य करिअर निवडून यश प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत. तसेच उत्तम गुण मिळवूनदेखील निवडलेल्या क्षेत्रातील अभ्यासक्रम, ताण-तणाव हाताळता आले नाही असेही विद्यार्थी आहेत. सध्या उपलब्ध असेलेले करिअर्सचे विविध पर्याय बघता मर्यादित दृष्टिकोन न ठेवून, अधिक माहिती मिळवून योग्य निर्णय घेणे हितकारक ठरेल. लक्षात घ्या, निकाल, गुण हे करिअर निवडीतील केवळ पहिले पाऊल आहे. तेव्हा आपल्या पाल्यासाठी कोणतेही करिअर निवडताना पुढे नमूद केलेल्या गोष्टींचा पालकांनी वस्तुनिष्ठपणे विचार करणे गरजेचे आहे: * प्राप्त गुण तुमच्या पाल्याची खरी क्षमता प्रतिबिंबित करतातच असे नाही. एखाद्या विषयाबद्दल तुमच्या पाल्याची असलेली वैचारिक समज आणि प्रत्येक विषयात प्राप्त केलेल्या गुणांचे विश्लेषण करा. * तुमच्या पाल्यास कोणते विषय सहजरित्या सोपे वाटतात किंवा कोणते विषय कठीण जातात हे समजून घ्या. * तुमच्या पाल्याची खरी आवड कशात आहे हे जाणून घ्या. * तुमच्या पाल्याचा शिक्षणाबाबत असलेला दृष्टिकोन समजून घ्या. जसे की, काही करिअर्ससाठी जास्त वेळ अभ्यास करण्याची आवश्यकता असते, तेव्हा त्यासाठी तुमच्या मुलाची तत्परता किती आहे याबाबत चर्चा करा. * उच्च शिक्षणासाठी भारतात तसेच परदेशातील उपलब्ध संधी, आवश्यक आर्थिक संसाधने याविषयी जाणून घ्या. * किती कालावधीपर्यंत तुमच्या पाल्याचे शिक्षण सुरू राहिल्यास तुम्हाला त्याबद्दल हरकत नाही हे ठरवा. जसे की, तुमच्या पाल्यास नोकरी मिळेपर्यंत किंवा त्याने/तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करेपर्यंत किती वर्षं तुम्ही प्रतीक्षा करण्यास तयार आहात? * समजा ऐच्छिक कॉलेज किंवा कोर्ससाठी प्रवेश मिळाला नाही तर बॅकअप पर्यायांचा विचार केला आहे का? तुम्ही मिळवलेल्या माहितीबाबत तसेच तुमच्या पाल्याच्या क्षमतेबाबत तुम्हाला खात्री नसेल, तर अॅप्टिट्यूड टेस्ट करून व्यावसायिक करिअर सल्लागाराची मदत घेणे नक्कीच फायदेशीर ठरेल. पालकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, शैक्षणिक कामगिरी महत्त्वाची असली, तरी यशाच्या मापदंडाचा तो एकमेव पैलू नाही. वैचारिक स्पष्टता तसेच प्राप्त केलेल्या ज्ञानाची अंमलबजावणी करता येणे गरजेचे आहे. तेव्हा वस्तुनिष्ठता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमच्या पाल्यास योग्य निर्णय घेण्यास मदत करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zJjC0A
via IFTTT

Post a Comment

0 Comments