फॅमिली पॅकेज! एकाच कुटुंबातील चारजण बारावी उत्तीर्ण

म. टा. वृत्तसेवा, ठाणे यश मिळवण्यासाठी वयाचे बंधन नाही तर जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी हवी असे म्हणतात, ते ठाण्यातील एका कुटुंबाने खरे करून दाखवले आहे. ठाण्यामध्ये सिद्धार्थ नगर येथे राहणाऱ्या केदारे कुटुंबातील चारजण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडायला लागलेल्या नामदेव केदारे (४८), संगीता केदारे (४७), सुजाता पोळ (३६) आणि कल्याण येथील के. एम. अग्रवाल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य पोळ या एकाच कुटुंबातील चौघांनी बारावी कला शाखेच्या परीक्षेत उत्तम गुण संपादन करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरी करणाऱ्या नामदेव केदारे यांनी दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा दिली. पतीला अभ्यास करताना पाहून त्यांची पत्नी संगीता यांनीही पुन्हा शिकण्यास प्रारंभ केला. संगीता यांची धाकटी बहीण सुजाता यांचेही गरीब परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट झाले होते. त्यामुळे त्यांनीही आपल्या बहिणीबरोबर नव्या उमेदीने शिक्षण सुरू केले. नामदेव, संगीता आणि सुजाता यांनी ठाण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाइट कॉलेजमधून बारावीची परीक्षा दिली. संगीता यांना ५६ टक्के, नामदेव यांना ४८ टक्के, सुजाता यांना ५४ टक्के, तर आदित्यला ७९ टक्के गुण मिळाले आहेत. ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९९.८७ टक्के राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल ९९.८७ टक्के लागला आहे. त्यामुळे ठाणे शहरात दुपारनंतर जल्लोषाचे वातावरण होते. मुले आणि मुलींच्या टक्केवारीत फारसा फरक नसून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात ९९.८९ टक्के मुली आणि ९९.८६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विज्ञान, वाणिज्य आणि कला तिन्ही शाखांमधील सर्वाधिक म्हणजेच ‍९९.९७ टक्के निकाल वाणिज्य शाखेचा लागला आहे. मागील वर्षी ठाणे जिल्ह्याचा निकाल ८९.८६ टक्के लागला होता. त्या तुलनेने यंदा निकालाची टक्केवारी तब्बल १० टक्क्यांनी वाढली आहे. बारावीसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण ८६ हजार ५३७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एकूण ८६ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ४४ हजार ४९२ मुले आणि ४१ हजार ९४१ मुलींचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मिरा-भाईंदर मनपा, कल्याण-डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा या क्षेत्रातील विद्यार्थी परीक्षार्थी होते. यामध्ये उल्हासनगर मनपा क्षेत्रातील विद्यार्थी सर्वाधिक टक्क्यांनी उत्तीर्ण झाले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VlYkaP
via IFTTT

Post a Comment

0 Comments