'सीईटी' प्रवेशप्रक्रियेस १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/पुणे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या 'सीईटी सेल'तर्फे घेण्यात येणाऱ्या आठ अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या () अर्जप्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करता येणार आहे. पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम असलेल्या एलएलबी, तीन वर्षांचा अभ्यासक्रम असलेले एलएलबी, याचबरोबर बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, बीएबीएड, बीएससी, बीएड, बीएड, एमएड (एकात्मिक) अशा एकूण आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दोन ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता त्यात आठ दिवसांची वाढ करून विद्यार्थी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करून शुल्क भरू शकणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोकण, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटामुळे जे विद्यार्थी प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करू शकलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आता मुदतवाढ मिळाल्याने अर्ज करणे शक्य होणार आहे. या आठ अभ्यासक्रमांप्रमाणेच इतरही काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा अर्जांसाठी मुदत मिळालेल्या अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक दहा ऑगस्टनंतर जाहीर होण्याची शक्यता असून, ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या परीक्षा होणार असल्याचे सूतोवाच सीईटी सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहेत. ...या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी संधी बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, एलएलबी (एकात्मिक पाच वर्षे), एलएलबी (तीन वर्षे), बीए (बी. एड), बीएससी (बी. एड). 'वेळापत्रक जाहीर करा' बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी या विद्याशाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सीईटीच्या अर्जांची मुदतवाढ संपून दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या सीईटीचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. येत्या दोन दिवसांमध्ये बारावीचे निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशांसाठी सीईटी द्यावी लागणार आहे. परीक्षा लवकरात लवकर घेऊन प्रवेश निश्चित करावेत, अशी मागणी विद्यार्थी करत असून, सीईटीच्या वेळापत्रकाकडे त्यांचे लक्ष लागले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Cb7NSN
via IFTTT

Post a Comment

0 Comments