Also visit www.atgnews.com
अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मुंबईचा मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर तालिबानने आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे तेथील नागरिकांची पिळवणूक सुरू आहे. यातच काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आयआयटी मुंबईत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणारे ११ विद्यार्थी अफगाणिस्तानमधील आहेत. त्यांना विशेष परवानगी म्हणून आयआयटी संकुलाचे दार खुले करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थेने घेतला आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांनी भारतात यावे या उद्देशाने 'इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स' (आयसीसीआर) या उपक्रमाअंतर्गत विविध देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी भारतात संधी दिली जाते. यामध्ये अफगाणिस्तानमधील विद्यार्थीही देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये संधी मिळाली आहे. यामध्ये आयआयटी मुंबईत ११ विद्यार्थी पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. करोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. यामुळे हे विद्यार्थी त्यांच्या घरी होते. मात्र आता तेथील परिस्थिती पाहता या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने अपवादात्मक परिस्थिती म्हणून त्यांच्यासाठी संकुल खुले करण्याचा निर्णय घेतल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिष चौधरी यांनी समाज माध्यमाद्वारे जाहीर केले. व्हिसासाठीही प्रयत्न या विद्यार्थ्यांनी संचालकांकडे विशेष परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असतील आणि लवकरच कॅम्पसमध्ये येतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांना तातडीने व्हिसा मिळावा यासाठी 'आयसीसीआर'ही विशेष प्रयत्न करत असल्याचे आयआयटी मुंबईतील प्राध्यापक अमित अग्रवाल यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आयसीसीआरचे काबूल येथे बोलणे झाले असून त्यांना लवकरच व्हिसा मिळून ते परत येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. देशभरातील संस्थांना आवाहन देशात दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ याचबरोबर विविध शिक्षण संस्थांमध्ये अफगाणिस्तानमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र सध्या प्रत्यक्ष शिक्षण बंद असल्याने हे विद्यार्थी त्यांच्या अफगाणिस्तानातील घरून ऑनलाइन शिक्षण घेत होते. आता जर आम्ही तेथे राहिलो तर आमचे शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिल, असे सांगत भारतात शिक्षण घेणाऱ्या अफगाणिस्तान येथील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षण संस्थांना त्यांचे परतीचा मार्ग खुला करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. याचबरोबर जेएनयू विद्यार्थी संघटनेनेही या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CJalrE
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments