विद्यापीठाचा एम.ए.निकाल: आदेश बांदेकर, मधुरा वेलणकर प्रथम श्रेणीत!!

जून २०२१ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या उन्हाळी सत्राच्या मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर एमए भाग १ व २ या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यातील एमए प्रथम वर्षाचा निकाल ८६.२२ टक्के तर द्वितीय वर्षाचा निकाल ८३.०२ टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये अनेक मान्यवर बसले होते, ते या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. विद्यापीठाच्या एमए भाग २ या परीक्षेत वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी एमए राज्यशास्त्र या विषयात ९४ % गुण प्राप्त केले आहेत. पत्रकार केतन वैद्य व संगणकशास्त्र विभागाच्या डॉ.अंबुजा साळगावकर यांनी एमए इंग्रजी या विषयात प्रथम श्रेणी प्राप्त केली. या मान्यवरांबरोबर एमए भाग २ मध्ये २२४० विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. तर ३२६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एमए प्रथम वर्षाच्या परीक्षेत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, चित्रपट व टीव्ही कलाकार आदेश बांदेकर यांनी राज्यशास्त्र या विषयात ८८.५ %, चित्रपट व टीव्ही कलाकार मधुरा वेलणकर यांनी मराठी विषयात ८२ %, वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी राज्यशास्त्र या विषयात ७६ % व कॅनडा येथील वैद्यकीय क्षेत्रातील एमडी असणाऱ्या डॉ.अलकनंदा धोत्रे यांनी इंग्रजी या विषयात ७० % गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत. एमए भाग २ या परीक्षेत एकूण २ हजार ८९४ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ३ हजार २३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत ३ हजार २३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेला ६ विद्यार्थी अनुपस्थित होते. तर या परीक्षेत २१७ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरवर्षी कलाकार, खेळाडू, राजकीय व प्रशासकीय व्यक्ती अशा अनेक मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील व्यस्ततेमुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही ते मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमधून शिक्षण पूर्ण करीत असतात. हे मान्यवर विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. - डॉ. प्रकाश महानवर, संचालक, आयडॉल


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lESwns
via IFTTT

Post a Comment

0 Comments