नऊ विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे एका शिक्षिकेची धडपड!

पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भावनेतून पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षिका () पल्लवी गायकवाड या डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन ज्ञानदानाचे काम करीत आहे. राज्यात ऑनलाइन शिक्षण सुरू असताना, गायकवाड त्यांच्या शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना वस्तीच्या ठिकाणी, समाज मंदिरात, घरी जाऊन शिकवले. आताही राज्यातील प्राथमिक शाळा बंद असतांना, सर्वांच्या संमतीने गायकवाड यांची शाळा सुरू आहे. राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२०पासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाचा पद्धतीने शाळा सुरू केल्या. मात्र, दुर्गम ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या इंटरनेटची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षणाचा फायदा होण्याबाबत साशंकता होती. ही बाबच लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या कोळावडे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका साधारण दीड वर्षांपासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने शिकवत आहे. टेमघर धरणाच्या जवळ असलेली शाळा नऊ विद्यार्थ्यांसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. राज्यातील शाळा बंद असतांनाही, गायकवाड या दररोज दापोडी ते कोळावडे असा प्रवास करून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजावा यासाठी स्वाध्याय पत्रिका तयार करणे. लिखाणाचा सराव होण्यासाठी दैनंदिन घडणाऱ्या गोष्टींचा आधारावर गृहपाठ देणे, व्हिडिओ तयार करून त्याद्वारे सोप्या भाषेत विद्यार्थ्याना शिकवणे, असे प्रयोग त्यांनी राबविले. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव चव्हाण हेसुद्धा तितक्याच तळमळीने विद्यार्थ्याची काळजी घेत, गायकवाड यांच्या प्रयोगांना पाठबळ देत आहेत. बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी असल्याने गेल्यावर्षी कोणाकडे स्मार्टफोन नव्हते. यंदा पालकांनी स्मार्टफोन घेतले आहे. मात्र, नेटवर्क नसल्याने ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय कायम आहे. त्यामुळे सर्वांच्या संमतीने शाळा सुरू असून, विद्यार्थ्यांचे ऑफलाइन शिक्षण सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. स्वखर्चातून शाळा, स्वच्छतागृहाची साफसफाई जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिपाई नसल्याने, शिक्षकांनाच शाळेच्या स्वच्छतेसह देखभाल-दुरूस्तीची कामे करावी लागतात. त्यानुसार संपूर्ण शाळेला रंगरंगोटी करून, आकर्षक पद्धतीने सजवले आहे. त्यामध्ये पहिली ते चौथीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा वापर केला आहे. निसर्ग वादळात शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले होते. मात्र, दोन्ही शिक्षकांनी प्रशासनाच्या सहकार्याने इमारत काहीच दिवसांत दुरूस्त केली. शाळेच्या स्वच्छतेसाठी त्यांनी मदतनीस नेमला असून, दोन्ही शिक्षक दर महिन्याला त्यांच्या पगारातील काही हिस्सा या मदतनीसाला देतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38shxKY
via IFTTT

Post a Comment

0 Comments