Career In Agriculture: शेतीचा करा अभ्यास

आनंद मापुस्कर Degree courses in : शेतीमधल्या करिअरविषयी जाणून घेत असताना कृषी विद्यापीठांमध्ये कोणकोणत्या विषयांवर पदवी अभ्यासक्रम आहेत हे आपण जाणून घेतले. त्यामध्ये वन, दुग्ध तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, हॉर्टिकल्चर, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांविषयी माहिती घेतली. आता कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम, त्यांची वैशिष्ट्ये, प्रवेश प्रक्रिया यावर एक नजर टाकू. कृषी अभ्यासक्रम महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत. ० महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ० डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ० वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ० डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चारही कृषी विद्यापीठांमध्ये चार वर्षे कालावधीचे ७ कृषी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कृषी पदवी अभ्यासक्रमांनादेखील एम.एच.टी.सी.ई.टी. प्रवेश परीक्षेच्या गुणांनुसार प्रवेश दिले जातात. कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी हे सर्व विषय घेऊन उत्तीर्ण होणे योग्य ठरेल. काही अभ्यासक्रमांसाठी १२वीला गणित किंवा जीवशास्त्र विषय नसतील तरी चालते. काही अभ्यासक्रमांसाठी १२वीला गणित / जीवशास्त्र विषय घेणे आवश्यक आहे. पण जर १२वीला ते विषय घेतले नसतील, तर विद्यापीठामध्ये पहिल्या वर्षी संबंधित विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी वेबसाइट पाहावी. १) बी.एस्सी.(ऑनर्स) (कृषी) २) बी.एस्सी. (ऑनर्स) (उद्यानविद्या) ३) बी.एस्सी. (ऑनर्स) (वनविद्या) ४) बी.टेक. (अन्नतंत्रज्ञान) ५) बी.टेक. (जैव तंत्रज्ञान) ६) बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) ७) बी.एस्सी. (ऑनर्स) (सामाजिक विज्ञान) अतिरिक्त गुण : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना एम.एच.टी.-सी.ई.टी. या प्रवेशपरीक्षेतील गुणांबरोबरीनेच खालील अतिरिक्त गुण ग्राह्य धरले जातात. शेतीसंबंधित विषय बारावीला घेतला असल्यास त्याचे १० गुण वाढीव मिळतात. ७/१२चा उतारा असणाऱ्या शेतीधारकांच्या तसेच भूमिहीन शेतमजुरांच्या (तहसीलदार/नायब तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक) पाल्यासाठी १२ गुण वाढीव गुण प्रवेशासाठी धरले जातात. या बरोबरीनेच खेळ, एन.सी.सी., वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धेच्या दर्जानुसार वाढीव गुण दिले जातात. (तपशिलासाठी वेबसाइटवर माहितीपत्रक पाहावे.) एकूण जास्तीत जास्त २० गुणच गृहीत धरले जातील. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर. कृषी विषयांशी निगडित डेअरी टेक्नॉलॉजी, फिशरीज सायन्समधील अभ्यासक्रम नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात उपलब्ध आहेत. बी.एस्सी. (फिशरीज सायन्स :) महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठामध्ये वरील चार वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. मत्स्य उद्योगामधील प्रशिक्षित मनुष्यशक्ती घडवण्याचे काम या अभ्यासक्रमाद्वारे चालते. या अभ्यासक्रमात मत्स्यजीवशास्त्र, अ‍ॅक्वाकल्चर, मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र, मत्स्य अभियांत्रिकी, मत्स्यस्रोत, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, फिशरीज हायड्रोग्राफी आदी विषयांचा समावेश असतो. हा अभ्यासक्रम खालील महाविद्यालयांत उपलब्ध आहे. १) कॉलेज ऑफ फिशरीज सायन्स, नागपूर. २) कॉलेज ऑफ फिशरीज सायन्स, उदगीर, जि. लातूर. बी. टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत दोन महाविद्यालयांमध्ये वरील चार वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान शाखेतून (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषयांसह) ५०% गुण (राखीव वर्ग ४०% गुण) प्राप्त विद्यार्थी पात्र ठरतात. १) डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज, वरूड, ता. पुसद, जि. यवतमाळ. २) डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज, उदगीर, जि. लातूर. या बरोबरीनेच विद्यापीठाशी संलग्न डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम, मुंबई येथील डेअरी सायन्स इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान शाखेतून ५०% गुण प्राप्त विद्यार्थी पात्र ठरतात. (लेखक मार्गदर्शक आहेत.)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38lIq34
via IFTTT

Post a Comment

0 Comments