पुणे विद्यापीठात कौशल्याधारित अल्प मुदतीचे अभ्यासक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे कौशल्यावर आधारित अल्प मुदतीचे अभ्यासक्रम शिकून थेट अर्थार्जन करता यावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे लवकरच पाच ते सहा अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, हे अभ्यासक्रम विविध कौशल्यांवर आधारित असणार आहेत. अभ्यासक्रमांचा कालावधी सुमारे सहा महिन्यांचा असेल, अशी माहिती देण्यात आली. या अभ्यासक्रमांमध्ये आयुर्वेद (आरोग्य), छोटे व्यवसाय, विविध वस्तूंचे उत्पादन अशा प्रकारांचा समावेश असेल. बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत. सरकारने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती कौशल्य विकास केंद्रातर्फे देण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी कौशल्य विकास केंद्रातर्फे मारुती सुझुकी या कंपनीशी करार करून ऑटोमोबाइल मार्केटिंगचा अभ्यासक्रम घोषित करण्यात आला आहे. याच धर्तीवर आता आणखी काही कंपन्यांशी करार करण्यात येणार असून, त्यांच्या साह्याने विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील काही अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना किमान वेतन (स्टायपेंड) दिले जाणार आहे. प्रत्यक्ष कौशल्य शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेता येणार असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कुटुंबातील अनेक कारणांमुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे पदवी, पदविका मिळवण्याचे शिक्षण घेता येत नाही; त्याचप्रमाणे कमी वयात कुटुंब चालवण्याची वेळ ज्या विद्यार्थ्यांवर येते, असे अनेक विद्यार्थी पैसे कमावण्याचा मार्ग शोधत असतात. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ विविध कौशल्ये शिकवणार असून, छोट्या छोट्या कालावधीच्या अभ्यासक्रमांद्वारे त्यांना नोकरी किंवा व्यवसाय तातडीने मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ग्रामीण भागांतील अनेक विद्यार्थी घरातील परिस्थितीमुळे अनेकदा उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. असे विद्यार्थी रोजगाराच्या शोधात असतात. या विद्यार्थ्यांना जर व्यावसायिक कौशल्यांचे शिक्षण मिळाले, तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यामुळे ग्रामीण भागांतील असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विद्यापीठात सुरू होत असलेल्या या अभ्यासक्रमांचा उपयोग होणार आहे. आयुर्वेदाबाबतचा 'अभ्यंग' अभ्यासक्रम अनेकदा आजारामुळे किंवा अपघातांमुळे अवयव निकामी झालेल्या नागरिकांना फिजिओथेरपी आणि आयुर्वेदिक उपचारांची गरज भासते. अनेक नागरिकांच्या घरी जाऊन हे उपचार करावे लागतात. या उपचारांची पद्धत शिकण्यासाठी कौशल्य विकास केंद्र 'अभ्यंग' या अभ्यासक्रमाची निर्मिती करीत असून, त्यातून उपचारांचे कौशल्य ज्ञात असलेले मनुष्यबळ घडवण्यात येणार आहे. महाविद्यालये सुरू झाल्यावर अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. कालांतराने या अभ्यासक्रमांमध्ये वाढही केली जाईल. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तातडीने नोकरी किंवा व्यवसाय करता यावा, असा यामागील उद्देश आहे. - डॉ. पराग काळकर, संचालक, कौशल्य विकास केंद्र


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3F34RZR
via IFTTT

Post a Comment

0 Comments