Right to Education: 'आरटीई'चे प्रवेश पूर्ण, 'इतक्या' विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

म. टा. प्रतिनिधी | पुणे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत () राबवली जाणारी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया शनिवारी संपली असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केले. प्रक्रियेच्या शेवटच्या फेरीत पुणे जिल्ह्यात ५०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १३ हजार ७२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी दिली आहे. आरटीई प्रवेशासाठी सोडतीमध्ये नाव लागलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांसाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत होती. त्यानंतर प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले. हे प्रवेश शनिवारपर्यंत सुरू होते. प्रवेशांच्या अखेरच्या दिवसापर्यंत राज्यात ७१ हजार ७१६ विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकले आहेत. राज्यात एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला होता; मात्र प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतरही ३० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले नाहीत. याबाबतची कारणे प्राथमिक शिक्षण संचलनालयाने अद्याप दिलेली नाहीत. प्रवेश का झाले नाहीत? राज्यात यंदा नऊ हजार ४३२ शाळांमध्ये यंदा ९६ हजार ६८४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. या जागांसाठी दोन लाख २२ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. इतक्या विद्यार्थ्यांनी अर्ज करून आणि प्रतीक्षायादीतील प्रवेशांचा कालावधी वाढवूनही जवळपास ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. बालकांच्या शिक्षण निर्देशांकात महाराष्ट्र तिसरा देशभरातील दहा वर्षांखालील बालकांमधील साक्षरतेचा निर्देशांक असलेल्या 'पायाभूत साक्षरता आणि संख्यता निर्देशांका'नुसार मोठ्या व लहान राज्यांच्या वर्गवारीमध्ये अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि केरळ ही राज्ये अनुक्रमे ५९ आणि ६८ गुणांसह अव्वल ठरली आहेत. 'इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पीटिटिव्हनेस'ने हा अहवाल तयार केला असून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी हा अहवाल जाहीर केला. मोठ्या राज्यांमध्ये तमिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. तर उत्तर प्रदेश (३८ गुण) आणि बिहार (३७ गुण) हे तळाशी आहेत. मोठी राज्ये, लहान राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील राज्ये अशा वर्गवारीमध्ये हा निर्देशांक जारी करण्यात आला आहे. लहान राज्यांचा विचार करता ६८ गुणांसह केरळ अव्वल ठरले, तर झारखंड ४५ गुणांसह तळाशी राहिले. केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५२.६९ गुणांसह लक्षद्वीप, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये ५१.६४ गुणांसह मिझोरम अव्वल ठरले. या दोन वर्गवारींमध्ये अनुक्रमे लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे तळाशी राहिले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32iVLcT
via IFTTT

Post a Comment

0 Comments