RTE प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंतच पूर्ण होणे बंधनकारक; विलंब टाळण्यासाठी नवा नियम

म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत () खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया यंदा ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळांमध्ये ३० सप्टेंबरनंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सलग दोन वर्षे प्रवेशप्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि उपस्थितीबाबत समस्या निर्माण होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ 'आरटीई'च्या २५ टक्के राखावी जागांसाठी एकाच टप्प्यात प्रवेशासाठीची सोडत काढण्यात येईल. त्याच वेळी शाळेत प्रवेशासाठीची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठवला जाईल. पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र, प्रतीक्षा यादीत नाव असण्याचा अर्थ प्रवेश निश्चित होईल, असा नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. चालू वर्षापासून शाळांची नवीन नोंदणी करताना नव्या स्वयंअर्थसाह्यित शाळांत तीन वर्षांपर्यंत 'आरटीई'चे प्रवेश देऊ नयेत. संबंधित शाळांची गुणवत्ता आणि सर्वसाधारण प्रवेश तपासून निर्णय घ्यावा. 'आरटीई'ची २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया लागू असलेल्या शाळांच्या नोंदणीची शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. ज्या शाळा पात्र असूनही नोंदणी न करणाऱ्या किंवा २५ टक्के जागा उपलब्ध करून न देणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे टेमकर यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले. चुकीचा पत्ता दिल्यास कारवाई चांगली शाळा मिळावी; म्हणून काही स्वयंसेवी संस्था पालकांना अर्ज भरून देताना विद्यार्थ्याच्या निवासाचे स्थान जाणीवपूर्वक शाळेच्या जवळ दाखवतात किंवा चुकीचे भरतात. अशा संस्थांबाबत तक्रार दाखल झाल्यास त्या संस्थांबाबत कायदेशीर कारवाई करावी. पडताळणी समितीने पत्त्याबाबतची खात्री करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://bit.ly/34hDu0z
via IFTTT

Post a Comment

0 Comments