मराठीतून ज्ञानप्रसाराचा अनोखा प्रयोग

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्ञानशाखेतील माहिती, लेख सर्वसाधारणपणे इंग्रजीतून उपलब्ध होतात. हा ज्ञानव्यवहार इंग्रजीतून चालतो. मात्र या ज्ञानशाखेतील लेख मराठीतून वाचकांपर्यंत पोहोचले तर त्याचा अधिकाधिक मराठी भाषकांना फायदा होईल. त्या ज्ञानशाखेतील संकल्पना सविस्तरपणे समजू शकतील, या उद्देशातून मुंबई विद्यापीठाच्या ऋषिकेश आणि निरंजन या विद्यार्थ्यांनी आलोक या शास्त्रचर्चेस वाहिलेल्या मुक्त मराठी नियतकालिकाची निर्मिती केली आहे. बुलडाणा येथील वर्णमुद्रा या प्रकाशनाच्या माध्यमातून २४ जानेवारी रोजी प्रा. मे. पुं. रेगे यांच्या जयंतीनिमित्त या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला आहे. हे नियतकालिक दर सहा महिन्यांनी वाचक भेटीला येईल. मानव्यशास्त्र, विज्ञान या क्षेत्रांमधील निबंध या अंकातून सादर करण्यात येणार आहेत. 'आलोक'च्या पहिल्या अंकामध्ये भाषाअभ्यासातील वाद व प्रवाद, भारतातील केंद्र-घटकराज्य संबध, संच सिद्धांताची ओळख, कृत्रिम बुद्धिमत्तेचे तत्त्वज्ञान, तंत्रशास्त्राचा परिचय, राजवाड्यांचे जन्मवर्ष - संशोधनाचे संशोधन हे विषय हाताळण्यात आले आहेत. 'एखाद्या ज्ञानशाखेतील संकल्पना संपूर्णपणे वाचकांसमोर मांडण्यासाठी त्यासाठी आवश्यक लेखांचा समावेश येत्या अंकातही करण्यात येणार आहे', असे या अंकाचे संपादक निरंजन यांनी स्पष्ट केले. 'प्रत्येक लेखावर सुमारे दोन महिने काम करण्यात येत आहे. त्यातील तथ्य तपासून, त्याची पडताळणी करून मगच हे लेख वाचकांसमोर आले आहेत. यामुळे वाचकांना अधिकाधिक शास्त्रशुद्ध, अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या पहिल्या अंकाला मराठी वाचकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणाहून छापील आवृत्तीसाठीही विचारणा होत आहे. येत्या काळात या अंकाच्या छापील आवृत्तीचाही विचार करण्यात येईल', असे संपादकांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र छापील आवृत्ती काढली तरी ऑनलाइन आवृत्ती लोकांना वाचण्यासाठी कायम निःशुल्क पद्धतीने उपलब्ध राहील, असेही संपादक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे नियतकालिक रेगे यांच्या जयंतीदिनी २४ जानेवारी आणि यांच्या जयंतीदिनी २४ जून रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या नियतकालिकाचा पहिला अंक https://ift.tt/2M1r6sN या लिंकवर उपलब्ध आहे. व्यावसायिक वापरास परवानगी सामग्रीचे वितरण आणि प्रतिमुद्रण नित्यमुक्त परवान्यासह मुक्त करण्यात आले आहेत. या सामग्रीची मूळ रूपातील किंवा परिवर्तित प्रतिमुद्रणे करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा व्यावसायिक किंवा अव्यावसायिक वापरही करता येऊ शकतो. मात्र त्यासाठी परवान्यातील अटींनुसार त्याचे वितरण करणे गरजेचे आहे. यासोबतच योग्य श्रेयनिर्देशही अपेक्षित आहे. मराठीत उपलब्ध झालेले हे साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा नित्यमुक्त मराठी नियतकालिकाचा प्रयोग राबवण्यात येत असल्याचे आलोक नियतकालिकातर्फे सांगण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iU57zJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments