JEE Main आणि NEET UG परीक्षांबाबत लवकरच निर्णय

JEE, Exam 2021: जेईई मेन आणि नीट यूजी परीक्षांची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण मंत्रालय लवकरच जेईई मेनच्या दोन प्रलंबित सत्रांची परीक्षा आणि मेडिकल नीट यूजी परीक्षेबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की इंजिनीअरिंगच्या प्रलंबित परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेण्यासाठी करोना स्थितीचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय नीट यूजी परीक्षा १ ऑगस्ट रोजीच नियोजित वेळेत घेता येईल का याचाही विचार केला जात आहे. या शैक्षणिक सत्रापासून जेईई मेन परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित केली जाणार आहे. फेब्रुवारीतली पहिल्या सत्रातील आणि मार्चमधील दुसऱ्या सत्रातील परीक्षा पार पडल्या आहेत. मात्र कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल आणि मे सत्रातील परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. दुसरीकडे नीट यूजी परीक्षांच्या बाबतीतही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या व्यतिरिक्त प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT)आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतील प्रवेशांसाठी आयोजित प्रवेश परीक्षा जेईई-अॅडव्हान्स्ड परीक्षा देखील स्थगित करण्यात आली होती. या परीक्षा ३ जुलै रोजी होणार होती. या व्यतिरिक्त केंद्रीय विद्यापीठ कॉमन एंट्रेंस टेस्ट (CUCET)वर देखील शिक्षण मंत्रालयाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. एनटीएच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या सीयूसीईटी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो. जेईई मेन्स दोन्ही सत्रांच्या परीक्षा वीस दिवसांच्या अंतराने घेण्याचा 'एनटीए'चा विचार असून, आधी एप्रिलच्या सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. विद्यार्थ्यांनी 'एनटीए'च्या वेबसाइटवर सातत्याने संपर्क साधत रहावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. राज्याच्या सीईटी सेलतर्फे घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने या परीक्षेचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, आपल्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर होणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cVizln
via IFTTT

Post a Comment

0 Comments