देशभरातील शाळांमध्ये भगवद्गीता शिकविणार? केंद्रीय शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशभरातील शाळांमध्ये भगवद्गगीता शिकविली जावी अशी मागणी केली जात होती. या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा झाली असून केंद्रीय शिक्षण विभागातर्फे यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारवर अवलंबून असल्याचे केंद्र सरकारतर्फे सोमवारी लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. 'सीबीएसई अभ्यासक्रमांतर्गत सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना या आधीपासूनच भगवद्गीतेचा काही भाग शिकवला जातो. त्यामुळे राज्य सरकारांची इच्छा असल्यास ते अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करू शकतात,' अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली. देशभरातील समस्त शालेय विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकविण्याची व्यवस्था करता येऊ शकते का, अशी माहिती मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी विचारली होती. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी हे उत्तर दिले. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी भोजपुरी भाषेला मान्यता देण्यासंदर्भात किंवा पहिली ते बारावीचे विद्यार्थी; तसेच त्यापुढील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात या भाषेचा समावेश करता येऊ शकतो का, अशी विचारणा केली होती. ‘झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशचे नागरिक अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहेत,’ असे ते म्हणाले. त्यावर ‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार, मुलांचे शिक्षण भारतीय भाषांमध्ये आणि प्रादेशिक भाषांमध्ये बंधनकारक केले आहे. राज्य सरकारे या नवीन धोरणांतर्गत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना भोजपुरी शिक्षण देण्याची तरतूद करू शकतात,’ असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qhcSnp
via IFTTT

Post a Comment

0 Comments