राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून होणार सुरू

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील कॉलेजांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाइन सुरू होणार आहेत. मात्र, करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवारी राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. करोनामुळे मार्च, २०२०मध्ये बंद झालेली कॉलेजे १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी ऑफलाइन सुरू झाली. त्यावेळी करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी होती. परंतु, पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने ५ जानेवारीपासून राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता रुग्णसंख्या घटू लागल्याने शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरणही पूर्ण होऊ लागले आहे. यामुळे १ फेब्रुवारीपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येतील, असे शासन परिपत्रक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी दोन लसमात्रा पूर्ण केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजांत तसेच विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसमात्रा पूर्ण झालेल्या नाहीत, अशांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून लशीच्या मात्रा देण्यात येतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. जे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. १५ फेब्रुवारीपर्यंत व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइनच घेण्यात याव्यात, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतरच्या सर्व परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात येतील. दरम्यान, कॉलेजे सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून विद्यापीठांनी नियोजन करायचे आहे. तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ, कॉलेजांनी हेल्पलाइनची व्यवस्था करावी आणि विद्यापीठांनी आपल्या वेबसाइटवर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच, हेल्पलाइन नंबर इत्यादी माहिती उपलब्ध करुन द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू राज्यातील सर्व वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत संबंधित विद्यापीठ, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण संचालक यांनी आढावा घेऊन व स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय निर्णय घ्यावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34biuIM
via IFTTT

Post a Comment

0 Comments