लसवंत वर्गाबाहेरच; दोन्ही डोस घेऊनही उपेक्षा; महाविद्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक करोना संसर्गाचा धोका फारसा नसल्याने सोमवार, २४ पासून राज्यभरातील विविध ठिकाणी अगदी नर्सरीपासूनच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे लशीचे दोन्ही डोस घेतलेले महाविद्यालयीन विद्यार्थी अद्याप वर्गाबाहेरच आहेत. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानाकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याची शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यभरातील व वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय जाहीर झाला. करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला. याचदरम्यान राज्यातील शाळाही बंद करण्यात आल्या. परंतु, करोनाचा धोका फारसा नसल्याचे लक्षात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने मात्र तेरा दिवसांच्या सुटीनंतर सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. १५ वर्षांखालील मुलांचे लसीकरण सुरू झालेले नाही. तरीही हा धाडसी निर्णय घेण्यात आला. परंतु, लशीचे दोन्ही डोस झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबाबत शिक्षण विभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे विद्यार्थी मॉल, हॉटेल, पर्यटनस्थळे अशा सर्व ठिकाणी फिरत असून, उच्च शिक्षण विभागाच्या धोरणामुळे केवळ महाविद्यालयांमध्ये हे विद्यार्थी येऊ शकत नसल्याचे चित्र आहे. ऑनलाइन शिक्षणाकडे केवळ आपात्कालिन परिस्थितीतील पर्याय म्हणून न पाहता मार्च २०२० पासून महाविद्यालयिन शिक्षणाची सगळी भिस्त ऑनलाइन शिक्षणावरच असल्याचे निदर्शनास आले आहे. संकल्पना न समजणे, प्रात्यक्षिके न करता येणे, लेक्चरसाठी कमी कालावधी मिळणे अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांना येत आहेत. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थ्याांमधूनही महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे उच्च शिक्षण विभाग मात्र साफ दुर्लक्ष करीत आहे. केवळ ८३ दिवस महाविद्यालये सुरू मार्च २०२० पासून बंद झालेली महाविद्यालये गेल्या एक वर्षातील १० महिन्यांमध्ये केवळ ८३ दिवस भरली. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू झाली. त्यानंतरही काही परीक्षा, दिवाळी यात वेळ गेल्यानंतर डिसेंबरपासून शिक्षण सुरळीत होते न होते तोच पुन्हा महाविद्यालये बंद झाली आहेत. 'व्यावसायिक'च्या विद्यार्थ्यांचे नुकसान प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू होण्यास डिसेंबरचा दुसरा आठवडा उजाडला होता. केवळ महिनाभर ही महाविद्यालये सुरू राहिली आणि लगेच पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचा अनुभव घेता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारात व्यावसायिक पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32zG7dC
via IFTTT

Post a Comment

0 Comments